होमपेज › Aurangabad › सचिन अंदुरेच्या घराची झाडाझडती

सचिन अंदुरेच्या घराची झाडाझडती

Published On: Aug 20 2018 1:35AM | Last Updated: Aug 19 2018 11:52PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

14 ऑगस्टला माझ्या पतीला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) क्रांती चौक ठाण्यात बोलावून घेतले. ते तेथे गेल्यानंतर काही वेळातच एका महिला कर्मचार्‍याचा समावेश असलेले पाच ते सहा जणांचे एटीएसचे पथक कुंवारफल्ली भागातील आमच्या भाड्याच्या घरी आले. त्यांनी दोन तास झाडाझडती घेतली, असल्याची माहिती सचिन अंदुरेची पत्नी शीतल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सीबीआयला डेडलाइन होती म्हणून माझ्या पतीला गोवले 

माझा पती निर्दोष आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाला 20 ऑगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण होताहेत. त्या पार्श्‍वभूमीवर कोर्ट सतत सीबीआयवर ताशेरे ओढत असल्याने त्यांना डेडलाइन होती म्हणूनच त्यांनी माझ्या पतीला या गंभीर गुन्ह्यात गोवले आहे, असा आरोप संशयित आरोपी सचिन अंदुरे याची पत्नी शीतल यांनी केला. रविवारी त्या स्थानिक माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. 
शीतल अंदुरे म्हणाल्या की, एटीएसचे पथक कुंवारफल्ली भागातील आमच्या भाड्याच्या घरी आले. त्यांनी दोन तास झाडाझडती घेतली, पण काहीही मिळून आले नाही. त्यानंतर पथक गेले. पुन्हा ते सचिनला घेऊन मुंबईला गेले. सोबत सचिनचा मोठा भाऊही  होता. 16 ऑगस्टला दुपारी साडेचार वाजता पोलिस सचिनला घेऊन घरी आले. त्यांनी सोडताच काही क्षणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) एम. एस. पाटील यांनी सचिनला घरातून उचलले. मुळात एटीएसने निर्दोष असल्याचे सांगून घरी आणून सोडल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली. 20 ऑगस्टची डेडलाइन असल्याने त्यांनी माझ्या पतीला या प्रकरणात गोवले, असा आरोप शीतल अंदुरे यांनी केला.

सचिनची सासुरवाडी औरंगपुर्‍यात

आरोपी सचिन अंदुरेेेची सासुरवाडी औरंगपुर्‍यातील आहे. पिंपळाच्या झाडाशेजारी एक केशकर्तनालय आहे. त्या दुकानातूनच सासर्‍यांच्या घराकडे रस्ता जातो. तेथे सचिन अंदुरेेेची पत्नी त्याच्या पाच महिन्यांच्या मुलीला घेऊन बसलेली होती. सुरुवातीला माध्यमांशी न बोलण्याचा पवित्रा घेणार्‍या शीतल तब्बल दोन तासांनी बोलण्यास राजी झाल्या. त्या म्हणाल्या, सचिन मूळचा औरंगाबादचा असून त्याने स.भु. महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. मागील आठ वर्षांपासून तो निराला बाजार भागातील एका कापड दुकानात अकाउंटंटचे काम करतो. सचिन व शीतलने तीन वर्षांपूर्वी घरच्यांच्या परवानगीने प्रेमविवाह केलेला आहे. 

आम्ही पोलिस ठाणे पहिल्यांदाच पाहिले

एटीएस पथक माझा मोबाइल घेऊन गेले. त्यांनी एक दिवस तपासणी केली आणि दुसर्‍या दिवशी आणून दिला. यापूर्वी आम्ही कधीच पोलिस ठाण्याची पायरी चढलेलो नाहीत. काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आमचे कुटुंब आहे. सीबीआयची कारवाई खोटी असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

सीबीआयने धमकावल्याचा आरोप

संशयित सचिन अंदुरे याला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या सीबीआय पोलिसांनी आम्हाला धमकावले. तुमच्याकडे सीबीआय पथक आले, हे कोणालाही सांगू नका. नाहीतर तुम्हालाही त्रास होऊ शकतो, असे ते म्हणत होते, असा आरोप अंदुरे याच्या नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना केला.