Thu, Jul 02, 2020 17:04होमपेज › Aurangabad › कन्नड : आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रेत घेतले ताब्यात

कन्नड : आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रेत घेतले ताब्यात

Published On: May 16 2019 8:22PM | Last Updated: May 16 2019 8:22PM
कन्नड :  प्रतिनिधी

तालुक्यातील जेहुर येथील बापू कडूबा रिंढे या तरुणाने बुधवारी (ता.15) कन्नड येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्महत्या केली होती.

या प्रकरणी एसडीएम यांच्या गाडीचा चालक सुनील चिंगोटे व मंडळ अधिकारी बी.एन. गवळी यांच्या विरोधात कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर तब्बल सुमारे 36 तासानंतर नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयातून मयताचे प्रेत गुरुवारी (ता16) सायंकाळी ताब्यात घेतले.

दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सदर तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी सदर तरुणाच्या प्रेताच्या शवविच्छेदनास विरोध केला होता. परिणामी सदर प्रेत कन्नड ग्रामीण रुग्णालयात रात्रभर पडून होते.

गुरुवारी सकाळपासून एसडीएम कार्यालय व शहर पोलिस ठाण्यात मयताचे नातेवाईक व गावकऱ्यांची गर्दी होती. तणावपूर्ण स्थिती बघता पोलिस प्रशासनाने औरंगाबादहून आर.सी.पी. तुकड़ी तसेच पिशोर, खुलताबद व कन्नड ग्रामीण पोलिसांना शहर पोलिस ठाण्यात बोलावून घेतले होते.

गुरुवारी(ता.16) सकाळी प्रेतास 24 तासांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने रुग्णालय प्रशासनाने मयत तरुणाच्या नातेवाईकांच्या अनुपस्थितीत व सरकारी पंचांच्या समक्ष सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रेताचे शवविच्छेदन केले. सदर प्रेत ताब्यात घेण्यास नातेवाईक न आल्यास, ते प्रेत औरंगाबाद येथील घाट रुग्णालयाच्या शवागृहात रवाना करावे लागेल असे रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
मात्र दुपारनंतर वरील दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान नातेवाईकांनी मयताचे प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कारासाठी जेहुरला रवाना झाले.

मायताचे वडील कडूबा आसाराम रिंढे (वय 50) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद केली की, एसडीएम कन्नड यांच्या गाडीचा चालक सुनील चिंगोटे व मंडळ अधिकारी बी. एन. गवळी यांनी माझ्या मुलास सतत त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले. शनिवारी(ता.11 मे) दुपारी 12 ते एकच्या दरम्यान जेहूर येथे माझा मुलगा रिकामे ट्रॅक्टर घेऊन चालला असताना एसडीएम यांच्या सरकारी गाडी ट्रॅक्टरला येऊन धडकली. सरकारी गाडीला डॅश लागल्यामुळे चालक चिंगोटे हा तीन लाख रुपये मागत होता. कमी जास्त करून दोन लाख दहा हजारात ठरले त्यापैकी एक लाख रुपये रविवारी (ता.12 मे) दिल्याचे माझ्या मुलाने मंगेश रिंढे यास सांगितले. याबाबत माझा मुलगा व माझ्यावर देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात खोटा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी (ता.15) सकाळी आमच्यावर गुन्हा का दाखल केला अशी विचारपूस करण्यासाठी एसडीएम कार्यालयात गेलो असता, कार्यालय परिसरात गर्दी  दिसली, तसेच माझा मुलगा जमिनीवर पडलेला दिसला, तेथे कन्नड पोलिस व तहासिलचे कर्मचारी उभे होते. पुढे ग्रामीण रुग्णालयात नेले असता मुलगा मरण पावलेला असल्याचे कळाले. माझ्या मुलाच्या मृत्यूस चिंगोटे व गवळी जबाबदार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची फिर्यादेत म्हटले आहे.

पोलिस प्रशासनाकडून जर घटना घडल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असता तर ३६ तास प्रेताची विटंबना झाली नसती. तर निवेदनात उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी व चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उपविभगीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरु यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती. मग फक्त मंडळ अधिकारी व चालक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.