Tue, Jun 15, 2021 12:36होमपेज › Aurangabad › टँकर उलटला... पेट्रोलसाठी उडाली झुंबड

टँकर उलटला... पेट्रोलसाठी उडाली झुंबड

Published On: May 09 2018 1:23PM | Last Updated: May 09 2018 1:23PMपाचोड : प्रतिनिधी

एखादा अपघात झाला की अपघातग्रस्तांना मदत करायचे सोडून त्यांच्या वस्तू पळवणे, चोरी करणे यासारख्या घटनांमुळे माणुसकी आता नावापुरतीच उरली आहे असे वाटते. लोकांमधली माणुसकी हरवत चालली आहे. असाच प्रकार आज सकाळी औरंगाबाद येथील रोहिलागड फाट्याजवळ घडला. पेट्रोल वाहतुक करणारा ट्रक पलटी झाला. त्यांनतर लोकांची पेट्रोलसाठी झुंबड उडाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घनसावंगी येथील पंपासाठी पेट्रोल घेऊन जाणारा टँकर ( क्रमांक एम एच २६एच ६९११ ) आज सकाळी दहा वाजता पलटी झाला. यात टँकर चालक किरकोळ जखमी झाला. त्यावेळी पेट्रोलची लयलूट करण्यासाठी एकच झुंबड उडाली. औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रोहिलागड फाट्या जवळ ही घटना घडली. रोहीलागड फाटयाजवळ तो वळण घेत असताना विजेच्या खांबाला धडकून महामार्गावर उलटला.

लोकांनी मिळेल त्यातून पेट्रोल पळवले

पेट्रोलचा टँकर उलटल्याची माहीती मिळताच आजुबाजूच्या गावातील वाहनधारकांसह तरुणांनी रिकाम्या बॉटल्या, प्लास्टिकचे कॅन घेऊन घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर सांडणारे पेट्रोल बाटल्यात भरण्यास सुरुवात केली. पेट्रोल मिळविण्यासाठी एकच झुंबड उडाल्याने टँकर चालक व क्लिनर भितीने गांगरुन गेले.

या घटनेची माहीती मिळताच पाचोड ( ता. पैठण) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी सहकाऱ्यासमवेत घटनास्थळ गाठले. पेट्रोल भरुन नेणाऱ्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. 

टँकर धडकलेल्या विजेच्या खांबावरील वीजपुरवठा खंडीत झाल्याने सुदैवाने जिवितहानी झाली नाही. रस्त्याने जाणाऱ्या वाहन धारकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याऐवजी पेट्रोल लुटीकडे मोर्चा वळवून लयलूट करण्यातच धन्यता मानली, त्यांनी माणुसकी हरवत चालल्याचे उदाहरणच दाखवून दिले.