Wed, Jul 08, 2020 15:31होमपेज › Aurangabad › बेलगाम रिक्षाचालकांना वेसण कधी घालणार

बेलगाम रिक्षाचालकांना वेसण कधी घालणार

Published On: Jun 21 2018 1:28AM | Last Updated: Jun 21 2018 12:55AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत करून शहराला वेठीस धरणार्‍या रिक्षाचालकांची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर टाकून आरटीओ कार्यालयाने यातून अंग काढून घेतले आहे. बेलगाम रिक्षाचालक असो किंवा इतर वाहनधारक असो त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आरटीओ कार्यालयाची आहे, परंतु आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याचा कांगावा करत आरटीओ कार्यालय वर्षानुवर्षे या कामातून अंग काढून घेत आहे. म्हणूनच रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत जाऊन आता तेच आरटीओ, वाहतूक शाखेच्या डोक्यावर बसून मिरे वाटत आहेत. 

शहरातील लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या वाढत आहे. यात प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात अग्रेसर असलेल्या रिक्षाचालकांचा शहरात सध्या धुमाकूळ सुरू आहे. वाहन कायदा त्यांनी गुंडाळूनच ठेवला आहे. एवढे असूनही आरटीओ कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. आरटीओ कार्यालय केवळ कागदोपत्री कारवाईचे आकडे दाखवून, कारवाई सुरू असल्याच्या वल्गना करून वेळ मारून नेण्याची परंपरा जपत आहे. याचा त्रास मात्र सर्वसामान्य प्रवासी व नागरिक यांना सहन करावा लागत आहे. वाहन कायद्यानुसार प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र असल्याशिवाय ते प्रवासी वाहतूक करू शकत नाहीत, परंतु अनेक रिक्षा मोडकळीस आलेल्या असून यातूनही प्रवासी वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. याकडे आरटीओ कार्यालय जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याने या रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे. 

कमी मनुष्यबळाचे तुणतुणे

आरटीओ कार्यालय कमी मनुष्यबळाचे तुणतुणे गेल्या कित्येक वर्षांपासून वाजवत आहे. ते आजही कायमच आहे. हेच कारण समोर करून आरटीओने प्रवासी रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे वाहतूक शाखेच्या खांद्यावर टाकली आहे. वाहतूक शाखा शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यात सर्व शक्ती खर्च करीत असताना कारवाईचा अतिरिक्‍त बोजा त्यांच्यावर येऊन पडत आहे. यामुळे बेलगाम रिक्षाचालकांचे फावत असून त्यांना कोणाचाच धाक राहिलेला नाही. 

 कठोर कारवाई केल्यास परिणाम

शहरात विनापरवाना, अल्पवयीन चालक, दारूच्या नशेत रिक्षा चालवण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. याकडे कोणाचेच लक्ष नाही. यावर बर्‍याच रिक्षा संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आवर घालण्याची मागणी केली, मात्र अद्याप ठोस कारवाई सुरू झालेली नाही. या धोरणामुळे रिक्षाचालकांबरोबरच आरटीओ कार्यालयही प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याची भावना सर्वसामान्य प्रवाशांत निर्माण झाली आहे. अशा रिक्षाचालकांवर वाहन कायद्यानुसार परमिट निलंबन किंवा परवाना रद्दची कारवाई केली तर इतर रिक्षाचालकांवर याचा वचक बसेल. अशा कारवाया केवळ कागदांवरच असल्यामुळे बेलगाम रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 

भंगार रिक्षांतूनप्रवासी वाहतूक

शहरात सुमारे 22 हजार रिक्षांतून प्रवासी वाहतूक केली जाते. यात सुमारे 3 हजारांपेक्षाही भंगार रिक्षा आहेत, परंतु त्यातूनही मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. अशातून अपघात झालाच तर आरटीओ कार्यालय जागे होते, अन्यथा ते इकडे लक्षही देत नाहीत. याची येथील अधिकारी व कर्मचार्‍यांना कल्पना आहे, परंतु अशा रिक्षांवर कारवाई करण्याऐवजी भंगार रिक्षा रस्त्यावर नसल्याचा दावा आरटीओ कार्यालयाकडून करण्यात येतो. यातूनच त्यांची मानसिकता दिसून येते.