Thu, Jul 16, 2020 00:05होमपेज › Aurangabad › आम्हीच या देशाचे मूळ मालक : डॉ. शिवलिंग

आम्हीच या देशाचे मूळ मालक : डॉ. शिवलिंग

Published On: Apr 09 2018 1:49AM | Last Updated: Apr 09 2018 1:46AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

हिंदू हा धर्म नसून संस्कृती आहे, तर लिंगायत हा प्राचीन धर्म असून आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत. धर्म व जीवनपद्धती वेगळी असल्यामुळे स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळालीच पाहिजे, असे स्पष्ट मत लिंगायत समाजाचे राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी मोर्चेकर्‍यांना संबोधित करताना मांडले.

लिंगायत समन्वय समितीने रविवारी काढलेल्या महामोर्चात राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांच्यासह जगद‍्गुरू माते महादेवी सहभागी झाल्या होत्या. शिष्टमंडळाने विभागीय आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनानंतर मोर्चाला मार्गदर्शन करताना डॉ. शिवलिंग शिवाचार्य म्हणाले, समाज आतापर्यंत शांत बसला म्हणून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. धर्म म्हणून मान्यता मिळणे ही सोपी बाब नाही, तर अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळू नये म्हणून अनेकजण कार्यरत आहेत. केंद्रशासनाने लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून लिंगायत धर्माला मान्यता द्यावी अन्यथा चार कोटी लिंगायत शासनाला झोपू देणार नाहीत. रक्‍ताचा एक थेंब शिल्लक असेपर्यंत आम्ही मागणी करीत राहू, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटक, तेलंगाणा, तमिळनाडूतूनही आले मोर्चेकरी 

मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा असल्याने या मोर्चासाठी कर्नाटक, तेलंगाणा, तामिळनाडू येथून अनेक समाजबांधव उपस्थित होते. इतर जिल्ह्यांमधून शनिवारीच मोठ्या संख्येने मोर्चेकरी हजर झाले होते. त्यांच्या राहण्याची व्यवस्था समन्वय समितीने विविध ठिकाणी केली होती.

मोर्चेकर्‍यांसाठी पाणी
अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने उन्हाळ्याचे दिवस असल्याने क्रांतीचौकात दोन ठिकाणी, पैठणगेट येथे एका ठिकाणी व आमखास मैदान येथे नाष्टा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुलमंडीवर पाण्याची व्यवस्था होती. शिस्तीने मोर्चा विभागीय आयुक्‍त कार्यालयावर पोहचला. मोर्चेकर्‍यांनी दिलेल्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. 

स्वयंशिस्तीचे दर्शन
लिंगायत समाजबांधवांनी मोर्चात स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले. हजारो बांधव येणार असल्याने समन्वय समितीने मोठ्या संख्येने स्वयंसेवक तैनात केले होते. या स्वयंसेवकांनी मोर्चेकर्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत मोर्चात चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर कुठलाही ताण आला नाही. मोर्चाच्या माध्यमातून होणारा कचरा मोर्चानंतर स्वयंसेवकांनी उचलून स्वच्छतेचे दर्शन घडविले.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त
लिंगायत समाजबांधवांच्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने मोर्चेकरी येणार हे माहित असल्याने पोलिस प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा बंदोेबस्त ठेवला होता. समन्वय समितीने केेलेल्या नियोजनामुळे पोलिस यंत्रणेवर फारसा ताण आला नाही. मोर्चामुळे क्रांतीचौक ते पैठणगेट या रस्त्यावरील वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आली होती.

लिंगायत धर्मियांवर अन्याय : जगद‍्गुरू डॉ. माते महादेवी
लिंगायत धर्माला स्वतंत्र, स्वाभिमानी, मानवतावादी इतिहास आहे. मात्र त्याची माहिती लिंगायत बांधवाला नसल्यामुळे समाज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रात मागे राहिला. हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लिंगायत धर्माला शासनमान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळालाच पाहिजे, अशी मागणी डॉ. माते महादेवी बेंगलेरू यांनी केली. बौद्ध, जैन, ख्रिश्‍चन, इस्लाम, शीख या धर्मांना शासकीय मान्यता असल्यामुळे अल्पसंख्याकाच्या सर्व वैज्ञानिक सवलती त्यांना मिळतात; परंतु 1951 साली लिंगायत धर्माची शासकीय मान्यता रद्द केल्यामुळे लिंगायत धर्मीयांना अल्पसंख्याकांच्या सवलती व हक्‍क मिळत नाहीत, हेच लिंगायत धर्मियांच्या सर्व समस्यांचे मूळ असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा संघाचा पाठिंबा
लिंगायत समाजाला स्वतंत्र लिंगायत धर्म म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी रविवारी क्रांतीचौकातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मराठा सेवा संघाने जाहीर पाठिंबा दिला. तसेच या मोर्चामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विश्‍वंभर गावंडे, डॉ. आर. एस. पवार, दीपक पवार, धनंजय पाटील यांची उपस्थिती होती.