Sat, Jul 04, 2020 04:55होमपेज › Aurangabad › नवीन शिवराईत लोकसहभागातून पाणी

नवीन शिवराईत लोकसहभागातून पाणी

Published On: Apr 14 2018 2:01AM | Last Updated: Apr 14 2018 1:56AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

नवीन शिवराई गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीने तळ गाठल्याने तीन महिन्यांपासून नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथील पाणीप्रश्‍न निकाली काढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून या विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. शुक्रवारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या विहिरीची पाहणी केली. येथील पाणीटंचाईवर तात्पुरत्या स्वरूपाचा तोडगा काढण्यासाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या उपस्थित शुक्रवारी झालेल्या बैठकीत लोकसहभागातून गावाला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

यासाठी तुकाराम कुंजर, नितीन साबळे, ज्ञानेश्‍वर गवळी, हरिदास नेव्हाल, बाळासाहेब कुंजर, योगेश कुंजर तसेच सरपंच पुष्पा गवळी यांनी प्रत्येकांनी आठवड्यातील एक-एक दिवस वाटून घेतला असून ते गावाला स्वखर्चाने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करणार आसल्याचे यावेळी केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले. टेंभापुरी प्रकल्पांतर्गत 2004 मध्ये पुनर्वसन झालेल्या नवीन शिवराई गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास पोहोचली आहे. गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्या शिवराईतील सार्वजनिक विहिरीवरून गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो, मात्र या विहिरीचे पाणी खालावल्यामुळे नागरिकांना गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 

येथील पाणीटंचाई लक्षात घेता तहसील विभागाच्या वतीने संपादित क्षेत्रात असलेल्या शेतकर्‍यांच्या तीन विहिरी अधिग्रहण करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते, मात्र विहिरीच्या अधिग्रहणाला शेतकर्‍यांनी विरोध केला होता, शासनाच्या गलथन कारभारामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप करीत उपसरपंच हरिदास नेहाल यांनी येथील पाणीप्रश्‍न तत्काळ न सोडविण्यात आल्यास आत्मदहनाचा इशारा दिला होता.