Mon, Aug 03, 2020 15:34होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : वीस टन कचरा जळून खाक

औरंगाबाद : वीस टन कचरा जळून खाक

Published On: May 09 2019 9:07PM | Last Updated: May 09 2019 9:07PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

कचराकोंडीला पंधरा महिने झाल्यानंतरही मनपाकडून शहरात ठिकठिकाणी कचरा साठवून ठेवला जात आहे. रमानगरातील शेडमध्ये अशाच पद्धतीने साठविलेल्या सुक्या कचर्‍याला गुरुवारी भीषण आग लागली. यात शेडसह वीस टन कचरा जळून खाक झाला. तसेच शेडलगतची दोन मोठी झाडेही भस्मसात झाली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात धुराचे उंचच उंच लोट उठले. 

आगीची माहिती मिळताच अग्‍निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन बंबांसह आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आग इतकी भीषण होती की पाणी मारुनही आग नियंत्रणात येत नव्हती. त्यामुळे जेसीबीच्या साह्याने शेड उखडून फेकण्यात आले. त्यानंतर आतील कचर्‍यावर पाण्याचा मारा करण्यात आला. तरीही संपूर्ण कचरा जागेवरच जळून खाक झाला. सोबतच बाजूला असलेले दोन मोठे वृक्षही आगीत भस्मसात झाले.

कायमस्वरुपी डेपो बनला

गतवर्षी शहरात कचराकोंडी निर्माण झाली. त्यावेळी मनपाला मदत म्हणून नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी तात्पुरत्या स्वरुपात कचरा साठविण्यासाठी रमानगरातील मोकळी जागा उपलब्ध करुन दिली. पालिकेने या ठिकाणी मोठे शेड उभारले. कचरा केंद्रांच्या जागा निश्‍चित झाल्यानंतरही मनपाने रमानगरातील हे तात्पुरते केंद्र बंद केले नाही. पालिकेच्यावतीने सध्याही तिथे कचरा साठविण्यात येत आहे. त्याला स्थानिक नागरिक आणि नगरसेविकांनी वांरवार आक्षेप घेतला. तरीही अधिकार्‍यांनी दाद दिलेली नाही. 

अधिकारी फिरकलेच नाहीत

भीषण आगीची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे हे मात्र इकडे फिरकले नाहीत. काही जणांनी त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी फोनही घेतले नाहीत. पालिकेचे अधिकारी रमानगरात बेकायदा कचरा साठवून ठेवत आहेत. याआधीही तीन महिन्यांपूर्वी इथे आग लागली होती. त्याचवेळी आम्ही इथे कचरा साठविणे बंद करण्याची मागणी केली. पण अधिकार्‍यांनी ऐकले नाही. 
- शिल्पाराणी वाडकर, नगरसेविका