Mon, Jul 06, 2020 17:20होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : राडा मनपात, तणाव जुन्या शहरात

औरंगाबाद : राडा मनपात, तणाव जुन्या शहरात

Published On: Aug 18 2018 9:42AM | Last Updated: Aug 18 2018 9:42AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मनपा सभागृहातील गोंधळानंतर टाऊन हॉल परिसरात काही दुकानांवर आणि भाजप संगठण मंत्र्यांच्या वाहनासह दोन गाड्यांवर तुफान दगडफेक केली. तसेच, वाहनचालकालाही बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे जुन्या शहरात पुन्हा तणावसद‍ृश परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, पोलिसांनी त्या भागात पुन्हा बंदोबस्त तैनात केला आहे.

शुक्रवारी मनपाची सर्वसाधारण सभा होती. सभेच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण, एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी त्यांना सभागृहातच बेदम मारहाण केली. सभागृहातील या राड्यानंतर एमआयएमच्या एका गटाने मनपात येऊन दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात भाजपचे संगठणमंत्री भाऊसाहेब देशमुख यांच्या गाडीची (क्र. एमएच 20, बीवाय 3935) तोडफोड केली. तुफान दगडफेक करीत त्यांच्या गाडीच्या पाठीमागील, बाजूच्या आणि समोरील काचा फोडण्यात आल्या. तसेच, चालक विकास बोराडे यालाही बेदम मारहाण करण्यात आली. याशिवाय आणखी एक गाडी (क्र. एमएच 20, डीजे 4422) हल्लेखोरांनी फोडली. त्यामुळे मनपा परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, त्यानंतर जमावातील काहींनी टाऊन  हॉल परिसरातील दोन दुकानांवर दगडफेक केल्याचा प्रकारही समोर आला. हा प्रकार समजताच तत्काळ मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

नगरसेवक मतीनविरुद्ध वेगवेगळे दोन गंभीर गुन्हे दाखल
मनपातील अभूतपूर्व गोंधळानंतर एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याच्याविरुद्ध शुक्रवारी सिटी चौक ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. मनपा सभागृहात झालेल्या गोंधळाप्रकरणी उपमहापौर विजय औताडे यांनी फिर्याद नोंदविली आहे. त्यावरून भादंवि कलम 153 (अ) (दोन समाजांत तेढ निर्माण करणे), 153 (दंग्यास चेतावणी देणे) आणि 294 (अश्‍लील भाषा वापरणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मनपा परिसरात उभ्या असलेल्या भाजप संगठणमंत्र्यांच्या वाहनासह इतर वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी बाळू वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहनांची नासधूस केली म्हणून वेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांनी दिली.

अन् चालक बाथरूममध्ये लपला
भाजपचे संगठणमंत्री भाऊसाहेब देशमुख यांच्या गाडीच्या चालकाला जमावाने मनपाबाहेर बेदम मारहाण केली. जमावाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर भीतीपोटी चालक चक्‍क बाथरूममध्ये लपून बसला होता. भाजपचे शिष्टमंडळ पोलिस आयुक्‍तांकडे आल्यावर आ. अतुल सावे यांनी फोन लावून पोलिस आयुक्‍तांशी बोलणे करून दिल्यावर तो बाहेर आला, अशी माहिती येथे
आलेल्या कार्यर्त्यांनी माध्यमांना दिली.

दोन दिवसांत कारवाई करू
मनपाबाहेर दगडफेक करणार्‍यांना ओळख पटवून तत्काळ अटक केली जाईल. त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. याशिवाय सभागृहात जो गोंधळ झाला त्याला कारणीभूत असणार्‍यांविरुद्धही योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. दोन दिवसांत कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल. - चिरंजीव प्रसाद,पोलिस आयुक्‍त