Fri, Sep 18, 2020 12:10होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत बाटली फिरवून अँटिबॉडीज चाचणी 

औरंगाबादेत बाटली फिरवून अँटिबॉडीज चाचणी 

Last Updated: Aug 21 2020 1:04AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

शहरात गेल्या दोन दिवसांपासून सिरो सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्यासाठी संबंधित वॉर्डात स्लम आणि सधन या भागाचे प्रमाण विचारात घेऊन कोणत्या भागातून किती नमुने घ्यायचे हे ठरते. त्यानंतर चिठ्ठया टाकून वसाहत निश्चित केली जाते. त्या वसाहतीत पोहचल्यावर चौकात रिकामी बाटली फिरविली जाते, त्या बाटलीचे तोंड जी दिशा दाखविल त्या दिशेने दहावे घर पाहून तिथे नमुना घेतला जात आहे.

दिल्लीच्या धर्तीवर शहरात दोन दिवसांपासून सिरो सर्वेक्षण केले जात आहे. कोरोना विषाणूशी लढण्यासाठी कोणत्या भागात किती लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाले हे पाहणे हा या सर्वेक्षणामागचा हेतू आहे. सर्वेक्षणाचा निष्कर्ष अधिक अचूक राहावेत यासाठी नमुना निवड पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. तसेच हे नमुने शहरातील सर्व भागातून घेतले जात आहेत. पाच दिवस चालणाऱ्या सर्वेक्षणात सर्व ११५ वॉर्डातून साडे चार हजार लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत. प्रत्येक वॉर्डातून ४० नमुने घेतले जात आहेत. परंतु हे नमुने घेतानाही वेगवेगळ्या गोष्टींचा आधार घेऊन त्या व्यक्तींची निवड होत आहे. 

मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी याविषयी माहिती दिली. पाडळकर म्हणाल्या, एखाद्या वॉर्डात स्लम भाग किती आहे हे आधी विचारात घेतले जाते. तेथील लोकसंख्येचे प्रमाण विचारात घेऊन स्लम भागातून किती नमुने घ्यायचे आणि इतर भागातून किती घ्यायचे हे ठरविले जाते. एकदा हे आकडे ठरले की नंतर वॉर्डातील वसाहतींच्या नावांच्या चिठ्ठया टाकल्या जातात. त्यातील चिठ्ठी उचलून वसाहत ठरते. वॉर्डातील स्लम भागासाठी आणि स्लम व्यतिरिक्त अशा दोन्ही भागांत ही प्रक्रिया राबविली जाते. नंतर संबंधित वसाहतीत पथक जाते. त्या वसाहतीत चौकात जाऊन एक रिकामी बाटली जमिनीवर फिरविली जाते. ही बाटली फिरायची थांबल्यावर तिचे तोंड ज्या गल्लीकडे असेल, त्या गल्लीत पथक जाते. तिथे दर दहाव्या घरातील एका व्यक्तीचे रक्त नमुने संकलित केले जातात. नमुन्यांच्या तपासणीनंतर त्याच्या माहितीच्या विश्लेषणासाठी घाटीत खास पथक तयार करण्यात आले आहे. घाटीच्या सामाजिक औषधशास्त्र विभागाचे डॉ. जग्गनाथ दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे. 

नमुने सर्वसमावेशक

रक्ताचे नमुने घेताना ते महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ, कनिष्ठ अशा सर्वांचेच सम प्रमाणात यावेत याचीही दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी पहिल्या दहाव्या घरात ज्येष्ठ महिलेचा, पुढच्या दहाव्या घरात वयाने लहान महिलेचा, त्यानंतर पुढच्या दहाव्या घरी ज्येष्ठ पुरुषाचा आणि त्या पुढच्या दहाव्या घरात वयाने लहान पुरुषाचा रक्त नमुना घेतला जात आहे. 

रोज २० वॉर्डांचे नियोजन

महापालिकेकडून शहरातील सर्व ११५ वॉर्डांमध्ये रक्त नमुने घेण्यात येणार आहेत. त्यासाठी दररोज वीस वीस वॉर्डांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वॉर्डातून सरासरी ३५ ते ४० जणांचे रक्त नमुने घेतले जात आहेत. या नमुन्यांची घाटीतील प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येईल. त्यात किती लोकांच्या रक्त नमुन्यांमध्ये ॲण्डीबॉडी तयार झाली हे समजेल. यात कुणाला क्वारंटाईन करण्याची गरज नाही. त्यामुळे नागरिकांनी रक्त नमुने देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी केले आहे.


झोपडपट्टी आणि सधन दोन्ही भाग अंतर्भूत

सिरो सर्वेक्षणासाठी संयुक्त पथकाने प्रत्येक वॉर्डातील सधन आणि झोपडपट्टी हे भाग निवडले. या भागातील प्रत्येक दहा घरामागे एक घरातील एका व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेण्यात येत आहेत. व्यक्तीची निवड देखील एक वृध्द, एक तरुण, एक वृध्द महिला, एक तरुणी अशी करण्यात आली. ४० घरांमधून रक्ताचे नमुने घेतांना प्रत्येक गटातील पाच व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.

 "