औरंगाबाद : प्रतिनिधी
नॅशनल मेडिकल कमिशन या बिलातील जाचक कलमांच्या विरोधात डॉक्टरांच्या ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) संघटनेने देशव्यापी संप पुकारला आहे. शहरातील वैद्यकीय सेवा मंगळवारी (दि. 2 बंद ठेवण्याचा निर्णय आयएमएने घेतल्याचे डॉ. रमेश रोहिवाल यांनी सांगितले.
केंद्र शासन घेऊन येत असलेल्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ या बिलामधील काही जाचक कलमांच्या विरोधात आयएमएतर्फे मंगळवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारीच हे बील संसदेत चर्चेसाठी ठेवले जाणार आहे. या बिलाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा तीव्र विरोध आहे. ते पूर्णत: धनाढ्य लोकांसाठी असून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणापासून वंचित ठेवणारे आहे. देशातील वैद्यकीय सेवेचा दर्जा यामुळे खालावणार असल्याचा आरोप आयएमएने केला आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही उदयास येऊ शकतो.
सर्वसामान्य होतकरू गरीब विद्यार्थ्यांना, गरीब जनतेला वेठीस धरणार्या या बिलाच्या विरोधात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन आयएमए संघटनेच्या वतीने खा. चंद्रकांत खैरे यांना देण्यात आले. या संपात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. रोहिवाल, सचिव डॉ. संतोष रंजलकर यांनी केले आहे.