Mon, Jul 06, 2020 10:26होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये बिबट्याचा थरार !

औरंगाबादमध्ये बिबट्याचा थरार !

Last Updated: Dec 04 2019 12:27AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

 शहरातील एन-1, सिडको परिसरात मंगळवारी  सकाळी 6.30 ते दुपारी 2.30 दरम्यान बिबट्याचा थरार पाहायला मिळाला. काळा गणपती मंदिराच्या पाठीमागील गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक करणार्‍यांना सर्वात आधी बिबट्या दिसला. त्यानंतर काही क्षणांत बिबट्याचे शहरातील फोटो व्हायरल झाले अन्  एकच खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर वन विभागाला पाचारण करण्यात आले. आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर मिशन बिबट्या यशस्वी झाले. डार्ट गनद्वारे (भुलीचे इंजेक्शन देणारी बंदूक) बिबट्याला भूल देऊन जेरबंद करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

एन-1, सिडको ही उच्चभ्रू वसाहत आहे. या भागातील काळा गणपती मंदिराच्या पाठीमागे जगदीश अग्रवाल यांचे स्प्रींगडेल्स अपार्टमेंट असून त्याच्या मागील बाजूला गार्डन आहे. परिसरातील लोक फिरण्यासाठी नियमित गार्डनमध्ये जातात. मंगळवारी पहाटे रामकृष्ण गोसावी हे मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना गार्डनमधील झाडांमधून काही तरी पळाल्याचा आवाज आला. परंतु, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दुसर्‍यांदा आवाज आल्यावर त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी तत्काळ तेथून काढता पाय घेत सर्वांना गार्डनमध्ये बिबट्या असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी गांभीर्य ओळखून तत्काळ कर्मचार्‍यांना त्या भागात पाठवले. लगेचच वन विभागाला माहिती देण्यात आली. 7 वाजता पोलिस व सव्वासात वाजता वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी एन-1 भागात दाखल झाले. त्यांनी खात्री करून लगेचच त्याला पकडण्यासाठीचे प्लॅनिंग आखले.

वन विभागाची 20 जणांची तीन टीम व 30 जणांची रेस्क्यू टीम आल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. पोलिस आणि वन विभागाची एकत्र बैठक झाली. त्यांनी बिबट्याला पकडण्याचे प्लॅनिंग आखले. शहरात बिबट्या घुसल्याची माहिती मिळाल्यावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे अगदी तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिस अन् वन विभागाकडून नेमकी माहिती घेत पोलिसांना केवळ बाहेरील बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर ज्या पडक्या खोलीत बिबट्या घुसला तेथे जाऊन केंद्रेकरांनी पाहणी केली. बिबट्या जेथे दडून बसला होता तेथे त्याला डार्ट गनने भुलीचे इंजेक्शन देणे शूटरलाही शक्य नव्हते. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या खिडक्या उघड्या करून एका बाजूने टॉर्च चमकल्यानंतर बिबट्याची हालचाल होईल, असा विचार समोर आला. तेव्हा खुद्द केंद्रेकरांनी टॉर्च आणला.

असा पकडला बिबट्या

प्रमोद नाईक आणि जगदीश अग्रवाल यांच्या बंगल्याच्या परिसरात दोन वेळा प्रयत्न करूनही बिबट्या वन विभागाच्या हाती लागला नाही. त्यानंतर बिबट्याने जागा बदलली. तो काळा गणपती मंदिराच्या बाजूच्या बंद बंगल्याच्या परिसरातील पडक्या खोलीत घुसून दडून बसला. बिबट्या खोलीत घुसल्याची खात्री पटल्यानंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांनी प्लायवूड व जाळीने पटकन ही खोली पॅक केली. त्यामुळे बिबट्या बाहेर निघू शकला नाही. त्यानंतर शूटर माजी सैनिक तथा वनरक्षक मोईनोद्दीन शेख यांनी डॉर्ट मारला. पहिलाच डॉर्ट योग्य ठिकाणी लागल्यामुळे मोहीम यशस्वी झाली, अशी माहिती प्रसाद आष्टेकर यांनी दिली.