Tue, Aug 04, 2020 22:51होमपेज › Aurangabad › साहित्य संमेलनासाठी आता नाशिक, उस्मानाबादचा विचार

साहित्य संमेलनासाठी आता नाशिक, उस्मानाबादचा विचार

Published On: Jul 02 2019 2:00AM | Last Updated: Jul 01 2019 10:05PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

आगामी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान मिळविण्यासाठी नाशिक व उस्मानाबादमध्ये स्पर्धा आहे. यजमानपदासाठी आलेल्या चार प्रस्तावांवर रविवारी औरंगाबादेत साहित्य महामंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.

नाशिक, उस्मानाबादशिवाय बुलडाणा व लातूरचा प्रस्ताव होता. यंदाचे साहित्य संमेलन यवतमाळला झाल्यामुळे बुलडाण्याचे तर उस्मानाबादची मागणी जुनी असल्यामुळे लातूरचे नाव तूर्त मागे पडले, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ढाले-पाटील यांनी दिली.  

महामंडळाच्या बैठकीत झालेली चर्चा, निर्णयाची माहिती सांगताना प्राचार्य ढाले-पाटील म्हणाले की, नाशिक आणि उस्मानाबादपैकी एकाची संमेलनासाठी निवड होईल. मात्र, त्यासंदर्भात नियुक्‍त केलेली समितीच निर्णय घेईल. नाशिकहून तेथील सार्वजनिक वाचनालयाकडून संमेलनासाठी प्रस्ताव आलेला आहे. 

संमेलनस्थळ निश्‍चितीची समिती

प्राचार्य ढाले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चित करण्यासाठी समिती नियुक्‍त करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. विद्या देवधर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र साळुंखे आदींचा समावेश आहे.