Wed, Jul 08, 2020 11:08होमपेज › Aurangabad › बुद्ध पौर्णिमेची वन्यजीव गणना यंदापासून बंद

बुद्ध पौर्णिमेची वन्यजीव गणना यंदापासून बंद

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 12:37AMऔरंगाबाद : जितेंद्र विसपुते

बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात मचाणावर बसून त्याद्वारे पाणवठ्यावर येणार्‍या प्राण्यांची गणना (मचाण सेन्सस) करण्याची पद्धत बरीच जुनी आहे. याद्वारे वन क्षेत्रातील वन्यप्राण्यांबाबत भविष्यकालीन धोरण ठरविण्यास प्रशासनाला मोठी मदत होत असे. मात्र ही पद्धत आता वन प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. या ऐवजी आता केवळ निरीक्षण करण्याची पद्धत वन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. 

30 एप्रिल रोजी असलेल्या बुद्ध पौर्णिमेपासून हा नवीन उपक्रम राज्यभरात वन विभागाकडून लागू केला जाणार आहे. वनक्षेत्रासह अभयारण्य, टायगर रिझर्व्हमध्ये असलेल्या पाणवठ्यांजवळ मचाण बांधून बुद्ध पौर्णिमेला (1 दिवस) प्राणीगणना केली जात होती. यामुळे वन संवर्धनाला हातभार लागत होता. शिवाय पर्यावरण आणि वन्यजीवस्नेही कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळत असे. मात्र ही पद्धत येत्या बुद्ध पौणिमेपासून कालबाह्य होणार आहे. या ऐवजी वन विभागानेे निसर्गानुभव मचाण निरीक्षण ही पद्धती अवलंबली असल्याचे नागपूर येथील वन्यजीव विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी सांगितले, तर वन्यजीव विभागाकडून याबाबत मंगळवारी सर्व विभागीय कार्यालयांना याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असल्याचे बोरीवली येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक  एम. के. राव यांनी सांगितले. 

विशेष म्हणजे बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना करण्याची ही पद्धत डेहराडून येथील वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कधीच बंद केली आहे. मात्र तरीही वन विभागाकडून सकारात्मक उद्देशाने हा उपक्रम पुढे सुरूच ठेवण्यात आला होता. मात्र यंदापासून ही पद्धत वन विभागाने पूर्णतः बंद केली आहे. 

Tags : Aurangabad, wildlife, count, Buddha Purnima, closed