Mon, Jul 06, 2020 04:28होमपेज › Aurangabad › भक्‍तांच्या मनोकामना पूर्ण करणारा खुलताबादचा भद्रा मारुती 

भक्‍तांच्या मनोकामना पूर्ण करणारा खुलताबादचा भद्रा मारुती 

Published On: Dec 13 2018 8:26PM | Last Updated: Dec 13 2018 8:26PM
खुलताबाद : पुढारी ऑनलाईन 

भक्‍तांची मनोकामना पूर्ण करणारे दैवत म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्यामुळे राज्यासह परराज्यांतील लाखो भक्‍त येथे दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे बजरंगबलीची मूर्ती निद्रा अवस्थेत असलेले  महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असून दुसरे मंदिर उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आहे. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे.  

औरंगाबाद शहरापासून  साधारण पंचवीस कि. मी. अंतरावर  खुलताबाद  शहर असून ते तालुक्याचे ठिकाण आहे. आपल्या देशात हनुमानाची लाखो मंदिरे आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या अख्यायिका आहेत.  

राजा भद्रसेन यांची याबाबत एक कथा प्रसिद्ध आहे. राजा भद्रसेन खुलताबाद येथील तलावाच्या किनार्‍यावर हनुमानाचे भजन गात होता. एक दिवस हनुमान तिथे प्रकट झाले आणि राजाला भजन गाताना त्यांनी ऐकले. भजन ऐकता-ऐकताच हनुमानाला झोप लागली. तेव्हापासून हनुमान येथे निद्रीस्त असल्याचे मानले जाते. त्यामुळे येथे बजरंगबलीची मूर्ती निद्रा अवस्थेत बघायला मिळते. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारे, नवसाला  पावणारे  दैवत  म्हणून  भद्रा मारुतीवर लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. 

याशिवाय राजस्थानमधील अलवर, गुजरातमधील राजकोट, उत्तर प्रदेशमधील इटावा, महाराष्ट्रातील चंदौली, मध्यप्रदेशमधील छिंदवाडा येथे हनुमानाची जागृत  मंदिरे आहेत. मात्र  बजरंगबलीची  मूर्ती निद्रा अवस्थेत असलेले महाराष्ट्रातील खुलताबादनंतर दुसरे मंदिर उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे आहे. खुलताबाद येथील मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर मनातील इच्छा व्यक्‍त केल्यानंतर ती नक्की पूर्ण होते, अशी भक्‍तांची श्रद्धा आहे. विशेषतः युवकांच्या इच्छापूर्तीसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. उद्योग, व्यवसाय किंवा नोकरीत यश मिळत नसेल तर तरुण भद्रा मारुतीचे दर्शनाला येतात. बजरंगबलीची उपासना केल्यानंतर या भाविकांना निश्‍चितपणे त्यात यश मिळते, अशी भक्‍तांची श्रद्धा आहे. 

हनुमान जयंती, रामनवमी आणि श्रावण महिन्यात  येथे लाखो  भक्‍त राज्यासह परराज्यांतून दर्शनासाठी येतात. तसेच औरंगाबादसह पसिरातील जिल्ह्यांतून अनेक भाविक श्रावण महिन्यात दर्शनासाठी अनवाणी येतात, हे विशेष.  श्री भद्रा मारुती संस्थानतर्फे हनुमान जयंती महोत्सव सोहळ्यासाठी राज्यभरातून १० ते १२ लाख भक्‍त येथे  हजेरी लावतात, असे मंदिर ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. 

३० एकरांत बांधकाम 

भद्रा मारुती संस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतिपथावर असून सुमारे ३० एकरांमध्ये  होणार्‍या  या बांधकामाचा  खर्च १२५ कोटी रुपये आहे. सध्या ८० बाय २०० फूट आकारात दुमजली सभागृहाचे बांधकाम चालू आहे. ३० एकरांमध्ये झाडे लावण्यात येणार असून भद्राकुंड, धर्मशाळा, बाजार संकुल, रस्ते, रुग्णालय, शाळा आदींचे कामे लकरच सुरू होणार आहेत. या कामासाठी दानशुरांनी दान करावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.