Wed, Jul 08, 2020 09:54होमपेज › Aurangabad › कचराकोंडीचा संताप रस्त्यावर 

कचराकोंडीचा संताप रस्त्यावर 

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 18 2018 12:56AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मागील दोन महिन्यांपासून शहरात निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्यात मनपा प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे. मनपाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध करण्यासाठी शहरवासीयांनी उस्फूर्तपणे एकत्र येत मंगळवारी (दि.17) पैठणगेट ते महापालिका मुख्यालयापर्यंत गार्बेज वॉक काढला. गार्बेज वॉकमध्ये सहभागी नागरिकांनी महापालिका हाय हाय, बरखास्त करा बरखास्त महापालिका बरखास्त करा, माझी सिटी ठकाठक, आश्‍वासन नको कृती करा... अशा जोरदार घोषणा मनपासमोर देत सर्वांचे लक्ष वेधले.

या गार्बेज वॉक मध्ये शेकडो नागरिकांनी काळ्या फिती लावून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.शहराच्या कचराकोंडीला आज 61 दिवस पूर्ण झाले. मात्र, ही समस्या अद्यापही जैसे थेच आहे. कचराकोंडी फोडण्यात मनपा प्रशासन सपेशल अपयशी ठरले आहे. नारेगाववासीयांच्या विरोधानंतर शहरात दोन महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झालेली आहे. मात्र, मनपाकडून अद्यापही यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे कचराकोंडीने त्रस्त नागरिक मनपाच्या आणि राजकारण्यांंच्या बेजबाबदार भूमिकेविरोधात गार्बेज वॉकच्या माध्यमातून मंगळवारी रस्त्यावर आले. पैठणगेट येथील गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकाळी 9 वाजता गार्बेज वॉकला सुरुवात झाली. गुलमंडी, रंगारगल्ली, सिटी चौक मार्गे ‘गार्बेज वॉक’ महापालिका समोर आला. यावेळी मोर्चेकर्‍यांंनी जोरदार घोषणाबाजी करीत महापौर नंदकुमार घोडेले यांच्या समक्ष आपले म्हणणे मांडले. 

यावेळी आमदार सुभाष झांबड, जितेंद्र देहाडे, सय्यद अक्रम, मानसिंग पवार, समीर राजूरकर, जगन्नाथ काळे, श्रीकांत उमरीकर, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, देविदास कीर्तीशाही, अजय शहा, संजय राखुंडे, अक्षय वैद्य, सौरभ यादव, कल्याणी पाटील, नेतल मुंदडा, त्रिवेणी मुंडे, डॉ. रश्मी बोरीकर, डॉ. मनोरमा शर्मा, चित्रलेखा मेढेकर, सुजाता लाहोटी, सुरेखा दंडारे, सोनिया खडके, किरण तांबोली, पारस गोडा, नुपूर भालेराव, सरस्वती पवार यांच्यासह कनेक्ट टीमचे सभासद आदींचा सहभाग होता.

Tags : Aurangabad, rage,  garbage,  road