Fri, Jul 03, 2020 16:21होमपेज › Aurangabad › ‘एटीएम’वर गोळीबार केलेले पिस्टल निघाले पोलिसाचेच

‘एटीएम’वर गोळीबार केलेले पिस्टल निघाले पोलिसाचेच

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:46AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

सेव्हन हिल उड्डाणपूल रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्टल पोलिसाचेच असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळावर सापडलेल्या खाली केस (पुंगळ्या) स्वामीला दिलेल्या काडतुसांच्याच असल्याचेही स्पष्ट झाले असून पोलिसांनी या पिस्टलचा कसून शोध सुरू केला आहे. गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी कायमस्वरूपी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीच्या शोधात आहेत. मात्र, 20 दिवसांनंतरही काहीच धागेदोरे हाती लागले नाहीत. पुंडलिकनगर पोलिसांचीही झोळी रिकामीच आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पिस्टलचे दोन राउंड (9 एमएम) फायर करून सेव्हन हिल उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर रोडवर पेट्रोल पंपाशेजारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 5 एप्रिल रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास हा गुन्हा घडला होता. हा प्रकार दुपारी 12 वाजता पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. तेव्हा एकच खळबळ उडाली होती. पुंगळ्या पाहून शासकीय काडतुसे असण्याची शक्यता तेव्हाच वर्तविली होती. त्यानुसार, शासकीय बनावटीची काडतुसे असल्याचे स्पष्ट झाले असून त्यावर 2013 साल लिहिलेले आहे. स्वामीलाही त्याच वर्षांच्या बनावटीची काडतुसे देण्यात आल्याची नोंद आहे. त्याच्या पिस्टलसह दहा काडतुसे गायब झाल्यामुळे ही काडतुसे तीच असल्याचे मानले जाते. 

त्यामुळे पहिल्या दिवसापासून या गुन्ह्याचा कसून तपास सुरू आहे. मात्र, 20 दिवसांनंतरही पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी सीसीटीव्ही फुटेज घेऊन नियमित संशयित भागात फिरत आहेत, परंतु फुटेजमध्ये दिसणारा आरोपी अद्याप कोणालाही ओळखता आलेला नाही. आतापर्यंत या गुन्ह्यात काहीच धागेदोरे हाती न लागल्यामुळे आरोपी निर्ढावण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. 

‘तो’ आरोपी अनोळखी
 

6 जानेवारी रोजी मध्यरात्री खोली बदलताना न्यायमूर्तींचा अंगरक्षक कॉन्स्टेबल अमित स्वामी याचे पिस्टल आकाशवाणी चौकात गायब झाले होते. दहा जिवंत काडतुसे आणि पिस्टल गायब झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंद असून स्वामीला तत्कालीन आयुक्‍त यशस्वी यादव यांनी बडतर्फ केले आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी ना स्वामीच्या ओळखीचा आहे ना त्याच्या मित्रांच्या. त्यामुळे आणखी अडचणी वाढल्या आहेत.  

Tags : Aurangabad, pistol, shot, fired, ATM,  policeman