Sun, Jul 05, 2020 16:43होमपेज › Aurangabad › अधिकार्‍याला लाचेच्या गुन्ह्यात अडकविणार्‍याविरुद्ध गुन्हा

अधिकार्‍याला लाचेच्या गुन्ह्यात अडकविणार्‍याविरुद्ध गुन्हा

Published On: Nov 16 2018 1:25AM | Last Updated: Nov 16 2018 12:25AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मनपाच्या अतिक्रमण विभागाचा तत्कालीन प्रमुख छबूलाल म्हातारजी अभंग याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली म्हणून मनपा अधिकार्‍यांनी खुन्नस ठेवून त्या तक्रारदाराविरुद्ध सातारा ठाण्यात फिर्याद नोंदविली. विनापरवानगी बांधकाम केले म्हणून गुरुवारी (दि. 15) मनपाचे इमारत निरीक्षक संजय लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख आयशा कैसर शेख नाजिमुद्दीन (रा. बशीर कॉलनी, रोषणगेट) यांचा सातार्‍यातील शहानगर येथे गट क्र. 36/30 मध्ये प्लॉट क्र. 82/3 आहे. तेथे त्यांचे बांधकाम सुरू आहे. ही माहिती मिळाल्यावर मनपा अतिक्रमण विभागाचे तत्कालीन प्रमुख छबूलाल अभंग आणि दुय्यम आवेक्षक (कंत्राटी) सचिन दुबे हे शहानगरात दाखल झाले. त्यांनी शेख आयशा यांचे बांधकाम बंद करण्याचे सांगत तेथील बांधकाम साहित्य जप्त केले होते. बांधकाम साहित्य परत घ्यायचे असल्यास 75 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यांनी अभंगविरुद्ध एसीबीकडे तक्रार नोंदविली होती. त्यानंतर सात सप्टेेंबर रोजी एसीबीच्या पथकाने अभंग आणि दुबे यांना 50 हजारांची लाच घेताना पकडले होते.

दरम्यान, मनापाने शेख यांना वारंवार नोटीस पाठवून अनधिकृत बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही त्यांचे बांधकाम सुरूच होते. त्यामुळे अखेर, या प्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक सागर कोते करीत आहेत. मनपाने सूडबुद्धीने केलेल्या या कारवाईबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्‍त केला जात आहे.

लाच दिली असती तर अनधिकृत बांधकाम चालले असते का?

शेख आयशा यांनी मनपाच्या अतिक्रमण विभागातील अधिकार्‍यांना लाच न देता त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात दिले होते. त्यामुळे खुन्नस ठेवून या विभागाने शेख यांना वारंवार पत्र पाठवून बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले. तसेच, त्यांचे बांधकाम सुरूच असल्याचे लक्षात आल्यावर मनपाचे कर्मचारी संजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पण, जर शेख यांनी लाच देऊन बांधकाम केले असते तर ते मनपाला चालले असते का?, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.