Sat, Jul 11, 2020 20:50होमपेज › Aurangabad › खैरेंनी आमच्या नावे शिमगा करू नये : रामदास कदम

खैरेंनी आमच्या नावे शिमगा करू नये : रामदास कदम

Published On: Dec 18 2017 2:28AM | Last Updated: Dec 17 2017 11:44PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

शहराच्या नामकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडून वर्षभरापूर्वीच केंद्राकडे पाठविला गेला आहे. खासदार म्हणून पुढची जबाबदारी खैरेंची आहे. त्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी उगाच आमच्या नावे शिमगा करू नये, अशा शब्दांत पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी खैरे यांच्या आरोपांना उत्तर दिले. 

पालकमंत्री कदम रविवारी देवदर्शनाच्या निमित्ताने औरंगाबादेत आले होते. या दौर्‍यात त्यांनी सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या मुद्द्यावरून सेनेचेच खा. खैरे यांनी पालकमंत्री कदम यांच्यावर निशाणा साधला होता. त्या अनुशंगाने बोलताना कदम म्हणाले, शहराचे संभाजीनगर असे नामकरण करावे असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी वर्षभरापूर्वीच केंद्राकडे पाठविलेला आहे.

इतक्या दिवसांत केंद्राकडून त्याला मंजुरी मिळणे अपेक्षित होते. तिथे पाठपुरावा करण्याचे काम खैरे यांचे आहे. त्याऐवजी ते मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावच पाठविला नाही, असे म्हणत आहेत. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. राज्य सरकारातील मंत्री म्हणून आम्ही आमचे काम केले आहे. आता पुढची जबाबदारी खैरे यांची आहे. त्यांनी त्यांचे अपयश झाकण्यासाठी उगाच आमच्या नावे शिमगा करू नये. त्यांना वाटत असेल की राज्य सरकारने प्रस्ताव पाठविलेला नाही, मुख्यमंत्री खोट बोलत आहेत, तर त्यांनी लोकसभेत प्रश्‍न विचारून ते उघड करावे, असेही कदम म्हणाले. महापौर निवडीवरूनही कदम यांनी खैरे यांना टोला लगावला. महापौरांनी निवड बिनविरोध व्हावी म्हणून खैरे मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात. त्याच पद्धतीने त्यांनी शहराच्या नामकरणाच्या आणि विकासाच्या मुद्द्याावरही मुख्यमंत्र्यांना भेटावे, असे पालकमंत्री कदम म्हणाले. 

दौर्‍यात खैरे गटाला ठेवले दूर

पालकमंत्री कदम हे देवदर्शनासाठी मराठवाड्यात आले होते. त्यांचा हा दौरा खासगी असल्याने तो गोपनियच ठेवण्यात आला. देवदर्शनाहून परतताना त्यांनी औरंगाबादेत सुभेदारी विश्रामगृहावर काही वेळ थांबा घेतला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मोजक्याच पदाधिकार्‍यांशी शहर विकासाच्या विषयावर चर्चा केली. याप्रसंगी नगरसेवक राजेंद्र जंजाळ, गजानन मनगटे, कृष्णा पाटील डोणगावकर, अंबादास दानवे असे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. खैरे गटाला मात्र या दौर्‍यापासून दूर ठेवण्यात आले. पालकमंत्री कदम शहरात येऊन गेल्याची साधी कल्पनाही सायंकाळपर्यंत खैरे गटाच्या पदाधिकार्‍यांना नव्हती. 

फुलंब्रीच्या युतीबाबत कल्पना नाही

फुलंब्री नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली. या अभद्र युतीची मला कल्पना नव्हती. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून याबाबत चर्चा करणार आहे, असेही कदम म्हणाले.