Fri, Nov 27, 2020 11:46होमपेज › Aurangabad › वेरूळ-अजिंठा लेणींचा ‘वारसा’ सुरक्षितच

वेरूळ-अजिंठा लेणींचा ‘वारसा’ सुरक्षितच

Last Updated: Nov 22 2020 11:33PM
औरंगाबाद  : जितेंद्र विसापुते

धोक्यात असलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या  यादीत (लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज इन डेंजर) जगभरातील (33 देश) 53 स्थळांचा समावेश असल्याचे युनेस्कोने जाहीर केले आहे. यापैकी एकही स्थळ भारतातील नाही. पर्यायाने राज्यातील इतर स्थळांसह औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ आणि अजिंठा लेणींचा सांस्कृतिक वारसा (वास्तू) सुरक्षित असल्याचे अधोरेखित झाले आहे. जगभरात 1,121 वारसा स्थळे आहेत.

भारतात 38 जागतिक वारसा स्थळे असून, सर्वाधिक  पाच  स्थळे  महाराष्ट्रात आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणीसह एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि द व्हिक्टोरीअन अ‍ॅण्ड आर्ट डिओ असेंब्ली इन मुंबई यांचा समावेश होतो. युनेस्को अंतर्गत जगभरातील वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी उपाययोजना केल्या जातात. तसेच नवीन स्थळांना दर्जा जाहीर केला जातो. शिवाय धोक्यात असलेल्या जगभरातील वारसा स्थळांच्या जपणुकीसाठी युनेस्को आपला कार्यक्रम जाहीर करीत असते. संबंधित देशांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविला जात असतो. 

युनेस्कोची धोक्यात असलेल्या वारसा स्थळांची यादी

युनेस्कोने धोक्यात असलेल्या जागतिक वारसा स्थळांची यादीच आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या यादीत भारतातील एकाही वारसा स्थळाचा समावेश नाही. पर्यायाने औरंगाबाद जिल्ह्याची ओळख असलेला अजिंठा आणि वेरूळ लेणीचा वारसा धोक्याच्या बाहेरच असल्याचे स्पष्ट होते. 1983 मध्ये युनेस्कोने वेरूळ आणि अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जाहीर केला आहे.  युनेस्कोकडून सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र या तीन प्रकारांत जागतिक वारसा स्थळांचे वर्गीकरण करण्यात येते. त्यानुसार अजिंठा आणि वेरूळ लेणी स्थळे सांस्कृतिक वारसा स्थळांत मोडतात.

अजिंठा लेणी   

सह्याद्रीच्या डोंगररांगेत औरंगाबाद जिल्ह्यात दीड कि.मी. लांबीचा ज्वालामुखीय काळ्या पाषाणाची (बेसाल्ट खडक) कडा कापून निसर्गरम्य वातावरणात येथील 29 लेणी कोरलेल्या आहेत. लेणीमधील मूर्ती आणि नक्षीकाम भारतीय शास्त्रीय कलेचा उत्तम नमुना आहे.  या लेणींमध्ये सुंदर असे नक्षीकाम, कोरीवकाम पाहायला मिळते. रंगीत चित्रे देखील या लेणींमध्ये आहेत, जी गौतम बुद्ध यांच्या जीवनावर प्रकाश टाकतात. सुमारे 200 वर्षे इ.स. पूर्व काळापासून प्रारंभ करीत येथील 29 लेणींचे खोदकाम केले. परंतु, इ.स. 650 मध्ये येथील खोदकाम थांबविले. मात्र, सन 1819 मध्ये बि—टिश वाघ शिकारी दलाने या लेणींचा पुन्हा शोध लावला. 

वेरूळ लेणी

वेरूळ लेणी बौद्ध, हिंदू आणि जैन परंपरांची साक्ष देतात. ज्या सहिष्णुता भाव दर्शवितात. येथील लेणींत 16 वैदिक हिंदू, 13 बौद्ध, तर 5 जैन लेणी आढळतात. या लेणींचे खोदकाम ‘आधी कळस, मग पाया’ यानुसार पहाडाच्या टोकापासून प्रारंभ करून पायथ्यापर्यंत येते.  इ.स. 5 व्या शतकात ही लेणी निर्माण झाली आहे. या लेणींतील कैलास मंदिर लेणे अखंड खडकातून निर्माण केलेले आहे. येथील लेणी सुमारे दोन कि.मी. अंतरात पसरलेल्या आहेत. हवा, पाणी, प्रकाश आणि पर्यावरण याचा इत्थंभूत अभ्यास करून कारागिरांनी येथील लेणी कोरल्याचे दिसते.