Thu, Jul 16, 2020 10:06होमपेज › Aurangabad › आईच्या परस्पर वडिलांनी महिनाभराचे बाळ विकल्याचा पोलिसांना संशय

नोकरी वाचवण्यासाठी दीड महिन्याचे बाळ विकले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

दोन मुले, एक मुलगी अशी तीन अपत्ये असताना चौथे अपत्य (मुलगा) झाल्यामुळे आता नोकरी गोत्यात येईल म्हणून पित्याने महिनाभराच्या मुलाला ओळखीच्या महिलेकडे दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. आईच्या परस्पर वडिलांनी या बाळाला विकल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यावरून बाळाला देणारे आणि घेणारे या दोघांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

शनिवारी कबीरनगरातील 60 वर्षीय महिलेकडे दीड महिन्याचे बाळ सापडल्यानंतर पोलिस तपासात हा प्रकार उघड झाला होता. महेंद्र बाविस्कर, असे बाळाच्या वडिलांचे नाव असून ते पूर्णा पंचायत समितीत लिपिक आहेत. तर, ज्या महिलेकडे बाळ होते तिचे नाव रजिया पठाण (रा. कबीरनगर) आहे. हमिदिया गार्डन, सातारा परिसरात राहणार्‍या तिच्या मुलीने बाळाला रजिया पठाण हिच्याकडे दिल होते.

याबाबत उस्मानपुरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कबीरनगर भागात राहणार्‍या 60 वर्षीय रजिया पठाण या महिलेकडे दीड महिन्याचे बाळ असून तिने ते विक्रीसाठी आणल्याची माहिती उस्मानपुरा ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी शनिवारी रजिया पठाण हिचे घर गाठले. तिच्याकडे असलेल्या बाळाबाबत विचारपूस केली.

सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा तिच्यावरील संशय बळावला. अखेरीस तिने बाळ त्याच्या आई-वडिलांनीच माझ्याकडे दिल्याचे सांगितले. तिने बाळाच्या वडिलांचा नंबरही दिला. त्यावरून पोलिसांनी बाळाचे वडील महेंद्र बाविस्कर यांना फोन केला. रविवारी त्यांना उस्मानपुरा ठाण्यात हजर राहण्याबाबत बजावले होते.