वाळूज महानगर : प्रतिनिधी
एका महाविद्यालयीन तरुणास मारहाण करुन त्याचे पैसे लुटल्या प्रकरणी गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीस बुधवारी पोलिसांनी अटक केली. या विषयी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले की, बजाजनगर येथील अजय राजेंद्र ढाकणे हा 9 सप्टेबंर 2016 रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन घराकडे जात होता. हायटेक कॉलेजवळ दुचाकी थांबवून तो मोबाईलवर बोलत असताना त्याच्या ओळखीचे राहुल हिवराळे, विशाल काळे व विशाल फाटे उर्फ मड्या या तिघांनी अजय यास लाथाबुक्याने मारहाण केली होती.
व त्याच्या खिशातील साडे आठ हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी राहुल हिवराळे व विशाल काळे या दोघांना अटक केली होती. मात्र विशाल फाटे हा तेव्हापासून फरार झालेला होता. शोध घेवून ही तो मिळून न आल्यामुळे कोर्टाच्या आदेशाने त्याला फरार घोषीत करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी खबर्याने दिलेल्या माहितीवरुन फौजदार अमोल देशमुख, जमादार कारभारी देवरे, भाऊसाहेब इंदोरे, प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, बाबासाहेब काकडे, बंडू गोरे, वसंत शेळके यांनी त्याला वाळूज महानगरात अटक केली