Wed, Jul 08, 2020 16:57होमपेज › Aurangabad › हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीस मुकणार

हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीस मुकणार

Published On: Apr 14 2018 2:01AM | Last Updated: Apr 14 2018 1:59AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शासनाने प्रारंभी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आदेश काढले. काही दिवसांतच हे आदेश फिरवत ऑफलाइन अर्ज करण्याचे फर्मान सोडले. मात्र, यामुळे गोंधळ निर्माण झाला. गेल्या वर्षी विभागात अनुसूचित जातींसह विविध प्रवर्गांतील 51 हजार 237 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदा ऑनलाइन-ऑफलाइनच्या घोळात निम्म्याने घट होऊन 31 हजार 268 अर्ज प्राप्‍त झाले आहेत. परिणामी, हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीस मुकण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.

पारदर्शकतेचा डंका वाजवत शासनाने प्रत्येक बाबीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीही ऑनलाइन अर्ज करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी इंटरनेटच्या साहाय्याने ऑनलाइन अर्ज भरले. मात्र, मध्येच पुन्हा ऑफलाइन अर्ज करण्याचे आदेश काढण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांतही संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ऑनलाइन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइनच महत्त्वाचे मानत ऑफलाइन अर्ज करण्याकडे दुर्लक्ष केले. 2016-17 मध्ये एकूण 51 हजार 237 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये जवळपास वीस हजार अर्ज तुलनेने कमी प्राप्‍त झाले. ऑनलाइन-ऑफलाइनच्या घोळात यंदा केवळ 31 हजार 268 विद्यार्थ्यांचेच अर्ज प्राप्‍त आहेत.

महाविद्यालयांची उदासीनता

विभागात 564 महाविद्यालये असून यापैकी अद्याप शंभरावर महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्तावच समाज कल्याण विभागाला प्राप्‍त झालेले नाहीत. विशेष म्हणजे 20 मार्च रोजीच प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत संपलेली आहे. आता प्रस्ताव आले तरी संचालकांच्या आदेशानंतरच स्वीकारले जातील, अशी माहिती समाजकल्याण विभागातर्फे देण्यात आली.