होमपेज › Aurangabad › संतप्त नागरिकांचे जलकुंभावर ठिय्या आंदोलन

संतप्त नागरिकांचे जलकुंभावर ठिय्या आंदोलन

Published On: Apr 01 2019 10:49AM | Last Updated: Apr 01 2019 10:27AM
औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. यातच सर्वत्र पाण्याची टंचाई सुरू आहे. औरंगाबादमधील सिडको येथे गेल्या सहा दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर टायरी जाळण्याचा प्रयत्न करत आहेत. 

सिडकोतील गुलमोहर कॉलनी वार्डात सलग सहाव्या दिवशीदेखील नळाला पाणी न आल्यामुळे नागरिकांनी पहाटे सिडको एन-5 येथील जलकुंभावर जाऊन ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मात्र दोन तास ठिय्या देऊनही कोणीही अधिकारी न फिरकल्यामुळे संतप्त नागरिकानी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. काही जणांनी रस्त्यावर टायर जाळण्याचा प्रयत्न केला.