Wed, Sep 23, 2020 01:03होमपेज › Aurangabad › सोयाबीन बियाणे निघाले बोगस; ६ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी

सोयाबीन बियाणे निघाले बोगस; ६ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी

Last Updated: Jul 13 2020 9:42AM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

सोयाबीनचे बोगस बियाणे बाजारात आल्याने यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद विभागातील (औरंगाबाद, जालना, बीड) तब्बल सहा हजार हेक्टरमधील बियाणे न उगवल्याने सहा हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या नाहीत. त्यामुळे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांचा आकडा प्रत्यक्षात जास्तीचा असण्याची शक्यता आहे.

वाचा : मुलींसमोर अश्लील चित्रफित पाहणाऱ्या नराधम बापास अटक

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद विभागात सोयाबीनचे सरासरी पेरणी क्षेत्र ३ लाख २८ हजार हेक्टर असून यंदाच्या खरीप हंगामात लवकर आणि मुबलक पाऊस पडल्याने तब्बल ११३ टक्के क्षेत्रामध्ये म्हणजे ३ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. लवकर पावसामुळे बळीराजा आनंदीत होता. मात्र हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जास्त दिवस टिकला नाही. 

लॉकडाऊन काळातही कृषी विभागाने शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून दिले, पण यातील बहुतांश बियाणे बोगस निघाले. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, पण बियाणे बोगस असल्याने ते पुन्हा देखील उगवले नाही. त्यामुळे विभागातील सहा हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मतानुसार एका शेतकऱ्याचे एक हेक्टर क्षेत्र पकडले तरी तक्रारी करणाऱ्या शेतकऱ्यांचेच क्षेत्र जवळपास सहा हजार हेक्टर होते. म्हणजे सहा हजार हेक्टर क्षेत्र बाधित समजावे. तसेच अनेक शेतकरी तक्रारी करीत नाहीत, त्यामुळे सोयाबीनची उगवण न झालेले क्षेत्र निश्चित जास्तीचे असण्याची शक्यता आहे. 

वाचा :

आज हायकोर्टात सुनावणी 

बोगस सोयाबीन प्रकरणात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्या न्यायालयात सुनावणी सूरु आहे. मागच्या सुनावणीत कोर्टाचे समाधान न झाल्याने १३ जुलैला होणाऱ्या सुनावणीवेळी औरंगाबाद विभागाचे कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आणि ते हजर न झाल्यास त्यांना अटक करून हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे कृषी विभागाची एकच धावपळ झाली असून, विभागात प्राप्त सहा हजार तक्रारींपैकी पाच हजार तक्रारींचा निपटारा केल्याचे जाधव यांनी सांगितले. 

वाचा :औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी ६६ रुग्णांची वाढ

तक्रारींचा जलद निपटारा

शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी उपविभाग स्थरावर समिती गठीत केली जाते. मात्र यावेळी जलद निपटारा करण्यासाठी तालुका स्तरावर समिती गठीत केली आहे. सहा हजारांपैकी पाच हजार तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी सहसंचालक जाधव यांनी दिली. 

कृषी विभाग शेतकऱ्यांविरोधी 

मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी मोठा पाऊस झाल्याने त्याचा विपरीत परिणाम सोयाबीन उगवण शक्तीवर झाला होता. त्यामुळे सोयाबीन बियाणाची संभाव्य कमतरता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी स्वतःचे बियाणे वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली होती. तरीही सोयाबीन बियाणे न उगवल्याने तक्रारी वाढल्याचा अजब दावा कृषी विभाग करीत आहे. 

शेतकऱ्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली

शेतकऱ्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असून दोषी कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. कोणाचीही गय केली जाणार नाही. कंपनी मालक, संचालक आणि व्यवस्थापक यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील. शेतकरीही तक्रार करू शकतात किंवा ग्राहक मंचाकडे दाद मागू शकतात. कंपन्यांनी दाखल न घेतल्यास त्यांचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो. 

- डॉ. डी. एल. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद.

वाचा : औरंगाबाद : दारूचा ९६८ कोटी महसूल बुडाला 

 "