Mon, Jun 01, 2020 21:47
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › ‘स्पा’मधील थाई तरुणींची थायलंडला रवानगी

‘स्पा’मधील थाई तरुणींची थायलंडला रवानगी

Published On: Dec 29 2017 1:53AM | Last Updated: Dec 29 2017 1:53AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा आणि दी स्ट्रेस हब’ या दोन स्पा सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट प्रकरणात पकडलेल्या नऊ थाई तरुणींना थायलंडला पाठविण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाने या तरुणींना गुरुवारी (दि. 28) पहाटे पोलिस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आले. तेथून दूतावासामार्फत त्यांची रवानगी थायलंडला करण्यात आली. 7 डिसेंबर रोजी पोलिसांनी या तरुणींना पकडले होते. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या विशेष पथकाने प्राझोन मॉलमध्ये छापा मारून आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट उघड केले होते. येथे चार ग्राहक, चार व्यवस्थापक आणि थायलंडच्या नऊ व दोन स्थानिक तरुणींना पकडले होते. चार आठवड्यांपासून थाई तरुणी पोलिसांच्या ताब्यात होत्या. त्यांना न्यायालयाच्या आदेशाने समतानगरमधील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले होते.

दुभाषीच्या मदतीने न्यायालयात त्यांचे जबाब नोंदविण्यात आले. या मुलींची चौकशी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना थायलंडला पाठविण्याची परवानगी दिली. त्यानुसार, पोलिसांनी मुंबई येथील थायलंडच्या दूतावासाशी मेलद्वारे पत्रव्यव्हार केला. या मुलींना महिला पोलिसांच्या बंदोबस्तात सुखरूप पाठवण्याच्या सूचना कोर्टाने पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार, गुरुवारी पहाटे या नऊ तरुणींना घेऊन महिला पोलिस निरीक्षक राजश्री आडे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, हवालदार विजयानंद गवळी तसेच चार महिला पोलिस कर्मचारी मुंबईला रवाना झाले. तेथून थायी दूतावासाच्या खर्चाने त्यांना थायलंडला रवाना करण्यात आले.

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असलेल्या या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा निरीक्षक शिवाजी कांबळे करीत आहेत. मात्र, त्यांना अजून स्पा सेंटरचा मालक डेरेक इलिस मायडो (30, रा. मालवण, मुंबई), फैजन रईस शेख (32, रा. कुर्ला, मुंबई) आणि विशाल कृष्णा शेट्टी यांचा काहीही शोध लागलेला नाही. विशेष म्हणजे, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांचे पथक यापूर्वीच मुंबईहून रिकाम्या हाताने परतले होते.