औरंगाबाद : प्रतिनिधी
जायंटस् गु्रप ऑफ औरंगबाद प्राईडतर्फे मध्यवर्ती बसस्थानकास सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनची सुविधा प्राप्त करून देण्यात आली. मात्र गेल्या महिन्याभरापासून हे मशीन बंद पडले आहे. फुकट मिळालेल्या वस्तूची किंमत नसते याची प्रचिती या प्रकारातून येत आहे. यातही मशीनच्या देखरेखीचा प्रश्न उभा राहिला तर प्रशासन म्हणतंय हे काम कंत्राटदाराचे आहे. कंत्राटदार प्रशासनाकडे बोट दाखवत आहे.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर जायंटस् गु्रप ऑफ औरंगाबाद प्राईडतर्फे सहा महिन्यांपूर्वी महिला स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आले होते. प्रवासी महिला तसेच बसस्थानकातील महिला अधिकारी कर्मचार्यांना यामुळे चांगली सुविधा उपलब्ध झाली. मात्र, या वेंडिंग मशीनमधील सॅनिटरी पॅड संपले असल्याने हे मशीन गेल्या महिनाभरापासून बंद पडले आहे. महिलांनी बंद मशीनबाबत कंत्राटदाराकडे विचारणा केली असता, मशीनमध्ये पॅड टाकण्याची जबाबदारी ही एसटी प्रशासनाची आहे, असे त्यांना सांगण्यात आले. हजारो रुपयांचे मशीन बसस्थानकास मोफत मिळूनही त्याची देखरेख प्रशासनास ठेवता आलेली नाही.
स्वच्छतागृहात अस्वच्छता : मध्यवर्ती बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यासाठी प्रवाशांना प्राथमिक सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे, मात्र स्वच्छतागृहात अस्वच्छता वाढली आहे. रोजची सफाई चांगल्याप्रकारे केली जात नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. तसेच अनेकदा पाणी उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे.