Fri, Apr 23, 2021 12:52
ठाकरे सरकारच्या वसुलीचा धंदा पूर्णपणे बाहेर आल्यास अर्धा डझन मंत्री घरी जातील : किरीट सोमय्या

Last Updated: Apr 05 2021 6:04PM

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

सचिन वाझे वसुली गँगचे कलेक्शन हे २ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. ठाकरे सरकारच्या वसुलीचा धंदा पूर्णपणे बाहेर आल्यास अर्धाडझन मंत्री घरी जातील. दोन गेले.. आता उरलेले चारही घरी जातील, अशी मला खात्री असल्याचे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सोमवारी (दि.५) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. 

सोमवारी सकाळी त्यांनी घाटी, मिनी घाटी रुग्णालय तसेच शहरातील कोविड केअर सेंटर्संना भेट देऊन आरोग्य सुविधांची पाहणी केली. सुभेदारी विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना व आघाडी सरकारच्या कारभारावर टिकेची झोड उठवली. सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख यांना शरद पवार यांनी ते शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. तर उद्धव ठाकरे यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वात आधी त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे. तसेच वाझे गँगने टीआरपी घोटाळा, बुकीकडून केलेले कलेक्शन, ड्रग्ज घेत असल्याबाबत समन्स पाठवणे, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अशा वेगवेगळ्या पॉकेटमधून २ हजार कोटींचे कलेक्शन केले आहे. हा सगळा पैसा अनिल देशमुख यांनी स्वत:कडे ठेवत होते का? त्यातील एनसीपीच्या खात्यात किती गेले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत, देशमुखांपाठोपाठ आता अनिल परबही तयारीला लागले असतील असे म्हणत परब यांना टोला लगावला. 

टिआरपी घोटाळ्यात जे चॅनल्स अस्तित्वात नाहीत, त्याच्या नावे मनी लॉड्रिंग केले असून, यात १ हजार कोटींच्या घोटाळ्याचे पेपर मी ईडीकडे पाठविल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, अनिल मकरिये, संजय केणेकर, समीर राजूरकर, भगवान घडामोडे आदींची उपस्थिती होती.

वाझेंच्या नियुक्तीची फाईलच गायब...

सचिन वाझे यांच्या नियुक्तीची फाईल मंत्रालय व पोलिस आयुक्तालयातून गायब करण्यात आली आहे. आता २० जून २०२० नंतरची नवीन फाईल बनविण्यात आल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला.