Fri, Jul 10, 2020 17:48होमपेज › Aurangabad › एसटी महामंडळ : मृत वाहकाला बोलावले ड्युटीवर

एसटी महामंडळ : मृत वाहकाला बोलावले ड्युटीवर

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 27 2018 1:09AMऔरंगाबाद : जे.ई. देशकर

मृत वाहकाला कामावर जुंपण्याचा प्रताप एसटी महामंडळातील अधिकार्‍यांनी केला आहे. सिडको बसस्थानकातील अधिकार्‍यांनी चक्क सात महिन्यांपूर्वीच मृत झालेल्या चालकांची ड्युटी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6  वाजता वेरूळच्या बसवर लावली, परंतु ड्युटीवर तो वाहक आलाच नसल्याने हा प्रकार समोर आला. त्या बसची फेरी रद्द करावी लागली.

कोणत्या बसवर कोणता चालक व वाहक जाणार याची तयारी अगोदरच केली जाते. चालक, वाहक ड्यूटी संपून घरी जात असताना उद्या कोणत्या मार्गावर आपली ड्युटी लागली याची माहिती त्याला मिळते. श्रावण महिना लागताच पहिल्याच सोमवारी (दि.13) वेरूळ मार्गावर धावणार्‍या सकाळी सहाच्या बसवर वाहक म्हणून एस.पी. घोडके (क्र.53347) यांची ड्युटी लागली.

श्रावणातील पहिलाच सोमवार असल्याने प्रवाशांची गर्दी होती. त्यामुळे चालक (क्र.15440) वेळेवर ड्युटीवर हजर झाला, परंतु वाहकच आला नाही. त्यावेळी शोधाशोध केली असता वाहक म्हणून ड्युटी शेड्यूलवर ज्याचा नंबर टाकला आहे, तो सात महिन्यांपूर्वीच मृत झाल्याचे समोर आले. त्यामुळे येथील अधिकार्‍यांत एकच धांदल उडाली. शेवटी ही बस फेरी रद्द करावी लागली. चालकाला दुसर्‍या बसवर  ऐनवेळी  ड्युटी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मृत वाहकाला ड्युटीवर बोलावण्याचा काही वेगळा हेतू नसतो अशा घटना जाणूनबुजून होत नाहीत तर त्या नजरचुकीने होत असतात, यापूर्वीही असे अनेक प्रकार घडलेलेे आहेत.  - प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक

... म्हणे किरकोळ प्रकार

प्रकार गंभीर असतानाही अधिकारी मात्र असे काही घडलेच नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. किरकोळ चुकांसाठी कर्मचार्‍यांवर कडक आणि तत्काळ कारवाई करणारे अधिकारी मात्र अशा चुका करणार्‍यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा सिडको बसस्थानक परिसरात सुरू होती.