Mon, Jul 06, 2020 03:41होमपेज › Aurangabad › रांजणगाव दांडगा हाणामारी प्रकरण 

आजी - माजी सरपंचांचासह २१ जणांवर गुन्हा दाखल

Published On: Dec 30 2017 1:27AM | Last Updated: Dec 30 2017 1:27AM

बुकमार्क करा
पाचोड : प्रतिनिधी

राजकीय वैमनस्यातून पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथील दोन गटांत गुरूवारी झालेल्या हाणामारीप्रकरणी परस्पर तक्रारीवरुन आजी - माजी सरपंचासह 21 जणांवर गुन्हा दाखल करून दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. शेख राजू शामद व फिरोझ शामद अशी अटक केलेल्य दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी विद्यमान सरपंच शेख रियाज बादशाह यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, नऊ महिन्यांपूर्वी तत्कालीन सरपंच अकील शामद यांच्या विरुध्द स्वतः सह माजी सरपंच अजीज अहमद यांनी अविश्वास ठराव पारित करून सरपंचपदावरून पायउतार केले होते. तेव्हापासून शेख अकिल व त्यांचे कुटुंबिय मनात राग धरून जिवे मारण्याच्या धमक्या देत होते. त्यातच अकिल शेख याने त्याच्या कार्यकाळा त मंजूर झालेल्या राष्ट्रीय पेयजल पाणी पुरवठा योजनेत 2 लाख 71 हजार 300 रुपयांचा गैरव्यवहार केल्याने विद्यमान सरपंच शेख रियाज याने जिल्हा- परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणी पुरवठा अभियंत्याकडे गैरकारभाराची तक्रार करून कार्यवाहीची मागणी केल्याने त्यांचा राग अनावर झाला.

गुरुवारी (दि.28) चौकशीकामी व नूतन नळयोजना कार्यान्वित करणेकामी  रांजणगाव येथे पथक आले. त्यांच्यासमोरच तत्कालीन सरपंच शेख अकिल व त्यांच्या कुटुबियांनी वाद घातला.  गावातील काही नागरिकांनी समजूत घालून त्यांचे भांडण मिटवले. चौकशी पथक गावातून परत गेल्यानंतर आम्ही कुटुबियांसमवेत स्वतःच्या घरासमोर बसलो असता, माजी सरपंच शेख अकिल, राजू शामद, शामद अहेमद,फेरोज शामद, इसाक अहेमद, शकील साहेबलाल  अशफाक शामद, आदील इसाक, कदीर इसाक, आबेद साहेबलाल या दहा जणांनी संगनमत करुन काठ्या कुर्‍हाडी, लोखंडी गज व तलवारीने हल्ला चढविल्याचा आरोप शेख रियाज यांनी या तक्रारीत केला आहे. 

या तक्रारीवरुन पोलिसांनी उपरोक्त माजी सरपंचासह दहा जणांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला.माजी सरपंच यांचा पुतण्या शेख कदीर इसाक याने दिलेल्या तक्रारीत म्हटले की,  मी, भाऊ, वडिलासह दुचाकीवरून शेतात जात असताना सरपंच शेख रियाज, राजू बादशाह, शेख अजीज अहमद, फय्याज शब्बीर शेख,  इम्रान इसाक,  अफसर शब्बीर, शब्बीर बादशाह, जावेद बादशाह, आसेफ राजु, शाकेर अब्दुल, अलीम अजीज यांनी संगनमत करून रस्त्यात अडवून माजी सरपंचाला मदत का करता म्हणून या अकरा जणांनी काठ्या कुर्‍हाडी, लोखंडी गज व तलवारीने मारहाण केली असल्याचे या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी उपरोक्त विद्यमान सरपंचासह 11 जणांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, प्रदीप एकसिंगे, गोरख कणसे, नुसरत शेख आदी करीत आहेत. सर्व जखमींवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत पोलिसांनी शेख राजू शामद व फिरोझ शामद या दोघांना अटक करून पैठणच्या न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

गावाच्या नावातच दांडगाई.....

रांजनगाव (दांडगा) गावाच्या नावातच दांडगाई असून येथील ग्रामस्थ त्या नावाप्रमाणेच आडदांड वृतीने वागतात. या गावाची लोकसंख्या अडीच हजारांच्या आसपास असून दोन - चार कुटुंब वगळता सर्वजण एक दुसर्‍याचे नातेवाईक आहेत. शिक्षीत केवळ दहा टक्के असून सर्वांना पहाटे उठणे जोर-बैठका काढणे, दुध पिऊन मेवा खाणे व ताकत पाळून केवळ भांडणात जय मिळविण्याचाच परिपाठ दिला जातो. आजपावेतो या गावात अनेक भांडणे झाली. ती सर्व रक्तरंजीतच होती. पाचोडच्या पोलीस ठाण्यात 1957 पासून या गावाच्या भांडणाच्या नोंदी असून अनेक प्रकरणात त्यांना शिक्षा झाली तर काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित  असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले.