Mon, Jul 13, 2020 07:56होमपेज › Aurangabad › औरंगाबाद महापालिका सभेत अभिनंदन ठरावावरून राडा

औरंगाबाद महापालिका सभेत अभिनंदन ठरावावरून राडा

Published On: Jun 14 2019 1:50AM | Last Updated: Jun 14 2019 12:44AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी प्रचंड गदारोळ झाला. अभिनंदन ठराव येताच भाजपच्या सदस्यांनी पाणीप्रश्‍न लावून धरला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे महापौरांनी एमआयएमच्या वीस सदस्यांवर दिवसभरासाठी निलंबनाची कारवाई केली. मात्र, या सदस्यांनी सभागृहाबाहेर जाण्यास नकार दिला. शेवटी महापौरांच्या आदेशावरून पोलिसांनी बळाचा वापर करत या नगरसेवकांना उचलून सभागृहाबाहेर काढले. 

प्राणिसंग्रहालयातील बछड्यांच्या नामकरण सोहळ्यासाठी पालिकेने खासदार इम्तियाज जलील यांना डावलले होते. त्यामुळे एमआयएमचे नगरसेवक आधीच नाराज होते. त्यात गुरुवारच्या सभेत जलील यांच्या अभिनंदन ठरावालाही बगल देण्यात आली. त्यामुळे हे सदस्य संतप्त झाले. विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी विरोध केला. महापौर नंदकुमार घोडेले यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील खासदारांचे आधीच अभिनंदन केल्याचे सांगत बोर्डे यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी भाजप सदस्यांनीही पाणीप्रश्‍न पुढे करत त्यावर चर्चेची मागणी केली. 

तर दुसरीकडे एमआयएमचे सदस्य अभिनंदन ठराव घेण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला. भाजपचे राजू शिंदे, प्रमोद राठोड यांनी राजदंड पळविला. महापौरांच्या आवाहनानंतर राजदंड जागेवर ठेवण्यात आला. मात्र, भाजप नगरसेवकांनी पाण्यासाठी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दुसर्‍या बाजूने एमआयएम नगरसेवकही महापौरांच्या आसनासमोर जमा झाले. या गोंधळात महापौरांनी सभेचे कामकाज तहकूब केले. पाच मिनिटांनंतर सभेला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, एमआयएम नगरसेवक मागणीवर ठाम होते. 

ठिय्या देणार्‍या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व महापौरांनी एका दिवसासाठी रद्द केले. या कारवाईनंतर नगरसेवक पुन्हा आक्रमक झाले. महापौरांचे कारायचे काय...’, महापौर हाय.. हाय... अशा जोरदार घोषणा देत त्यांनी सभागृह दणाणून सोडले. दुसर्‍या बाजूने शिवसेना-भाजप नगरसेवकांनी जोरदार घोषणा सुरू केल्या. त्यामुळे महापौरांनी पुन्हा सभा तहकूब करत पोलिसांना पाचारण केले.  

मात्र, आमचे आंदोलन लोकशाही पद्धतीने सुरू आहे, हात लावाल तर वाईट होईल, असा इशारा बोर्डे यांच्यासह नगरसेवकांनी दिला. त्यावर पोलिसांनी कारवाईसाठी प्रशासनाने लेखी पत्र द्यावे, अशी भूमिका घेतली. नगरसचिवांनी कारवाईसाठी पोलिसांना पत्र दिले. साडेतीन तासांच्या गोंधळानंतर पोलिसांनी दुपारी दोन वाजता एमआयएमच्या सर्व 20 नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. अनेकांना पोलिसांनी उचलून नेले, तर महिला नगरसेविका स्वतःहोऊन बाहेर पडल्या. दोन वाजेनंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.