Wed, Dec 11, 2019 16:45



होमपेज › Aurangabad › शहरातून झेपावणार देशभरात विमाने!

शहरातून झेपावणार देशभरात विमाने!

Published On: Jul 17 2018 1:29AM | Last Updated: Jul 16 2018 11:37PM



औरंगाबाद : प्रतिनिधी

पर्यटनासोबतच औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औरंगाबादेतील चिकलठाणा विमानतळावरून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, बौद्धगया यांसह आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीद्वारे विमानसेवा सुरू होण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल सोमवारी पडले. येत्या दोन महिन्यांत औरंगाबादहून आणखी दोन विमान कंपन्या नव्याने सेवा सुरू करतील, अशी माहिती उद्योजक राम भोगले यांनी पत्रकारांना दिली. तत्पूर्वी विभागीय आयुक्‍तालयात विमान प्राधिकरणाच्या केंद्रीय सहसचिव उषा पाधी, रुबिना अली यांच्यासह उद्योग, पर्यटन आणि विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. 

भोगले म्हणाले, गेल्या काही वर्षांत औरंगाबाद महसूल वाढला, मात्र प्लाइट्सची संख्या घटली. त्यामुळे औरंगाबाद विमानतळावरून जाणार्‍या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. विमानांची संख्या व प्रवासी संख्या कशी वाढवता येईल, यावर चर्चा झाली. औरंगाबादेतून नव्या फ्लाईट सुरू करणे किती गरजेचे आहे, हे पटवून सांगण्यात सीएमआयए, औरंगाबाद हॉटेल्स-रेस्टॉरंट असोसिएशन, टुरिस्ट एजंट, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, टुरिझम प्रमोशन गिल्ड यशस्वी झाले आहेत. सध्या औरंगाबादहून पाच फ्लाइट्स असून त्याद्वारे मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. येत्या दोन महिन्यांत औरंगाबादहून बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, बौद्धगया आदी वेगवेगळ्या ठिकाणच्या कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळतील. 

बुद्धिस्ट सर्किटच्या माध्यमातून कोलंबोहून श्रीलंकन एअरलाइन्सने औरंगाबादला पर्यटक आले तर त्याचा फायदा होईल. श्रीलंकन एअरलाइन्स कधीही सेवा करू शकते, त्यांना परवानगीची गरज नाही. बौद्धगयाला थायलंडहून फ्लाइट्स येतात, त्यामुळे पर्यटक कोलंबो-औरंगाबाद-बौद्धगया अशी कनेक्टिव्हिटी मिळेल. त्यामुळे मलेशिया, ऑस्ट्रेलिया यासह सगळ्या ठिकाणी कमी वेळेत व खर्चात जाता येईल, असे भोगले यांनी सांगितले.