औरंगाबाद : पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील यांची राजकारणातून निवृत्ती

Last Updated: Jan 13 2021 7:45PM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

गेल्या २५ वर्षांपासून औरंगाबादमधील पाटोदा गावाला राज्यभर ओळख देणारे विकास पुरुष भास्करराव पेरे पाटील यांनी गावच्या राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. पुढच्या पिढीला राजकारणात संधी देण्यासाठी त्यांनी राजकारणातून माघार घेतली आहे. आता फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वाचा : औरंगाबादमध्ये कोव्हिशिल्ड लस दाखल

आपल्या कल्पक योजनेतून पाटोदा गावाचा विकास करुन संपूर्ण देशाला आदर्श गाव अशी ओळख निर्माण करणाऱ्या भास्करराव पेरे पाटील यांनी अखेर राजकारणातून निवृत्ती घोषणा केली आहे. यावेळी ते बोलतना म्हणाले, आता पुढच्या पिढीला संधी द्यायची आहे. मी आपल्यापुढे, समाजापुढे काही नाही. इथे लोकशाही आहे. त्यामुळे मी या वर्षी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपले पॅनल उभे केले नाही. मीच का सरपंच व्हायचं ? बाकीच्यांना देखील संधी मिळायला हवी. माझ्यापेक्षा दुसरा कोणी चांगले काम करू शकतो.

माझ्याकडून जेवढे गावासाठी करणे होते तेवढे केले. मला नेहमी इतरत्र फिरावे लागते यामुळे मी मागच्या पंचवार्षिकला ठरविले होते की यापुढे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे रहायचे नाही. गेल्या पंचवीस वर्षात ग्रामपंचायतीत काम करताना मला जो अनुभव आला, तसेच गावोगावी फिरून घेतलेल्या बैठकीतून समाजाशी जी ओळख झाली यातून आपली गावे चांगली करण्याची प्रेरणा तरुणांना मिळाली. जुन्या व नव्यांची मेळ घातल्यास गावच्या विकासाला होतो. ग्रामपंचायतीच्या निवडणुका ग्रामविकासावर व्हायला पाहिजे, असे मत यावेळी पेरे पाटील यांनी व्यक्त केले. 

वाचा : मराठा आरक्षण मागणीसाठी औरंगाबादेत युवकांचा एल्गार

पुढे पेरे पाटील म्हणाले, माझ्या मुलीला ग्रामपंचयात निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे मी तिला प्रभाग दोन मधून तिला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. यापुढेही कुणी माझा सल्ला घेणार असेल तर सल्ला देण्यास मी तयार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वाचा : औरंगाबादचे नामांतर केल्यास स्वागतच करू : विनायक मेटे