Tue, Jul 14, 2020 01:54होमपेज › Aurangabad › जिल्हा बँकेतील उमेदवारांच्या याचिका अंशत: मंजूर

जिल्हा बँकेतील उमेदवारांच्या याचिका अंशत: मंजूर

Published On: Apr 06 2019 1:52AM | Last Updated: Apr 06 2019 1:47AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 465 पदांची  भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) नाशिक, यांच्या आदेशाला आव्हान देणार्‍या जिल्हा सहकारी बँक व  निवड झालेल्या उमेदवारांच्या याचिका औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी (दि. 5 एप्रिल) अंशत: मंजूर केल्या. भरती प्रक्रियेसंदर्भात सहा महिन्यात काही उमेदवारांच्या फेर चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. जी. अवचट यांनी  दिले आहेत.

खंडपीठात दाखल याचिकांनुसार अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचारी भरतीसाठी 10 जून 2017 रोजी जाहिरात दिली होती. त्यात प्रथमश्रेणी अधिकार्‍यांची 7 पदे, द्वितीय श्रेणीचे 63, कनिष्ठ अधिकार्‍यांचे 236 तर लिपिक पदांचे 155 व अन्य अशा 465 पदांसाठी ही जाहिरात होती. यासाठी 17 हजार 12 उमेदवारांचे अर्ज आले. त्यांची 12 व 13 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात आली. 11 सप्टेंबर 2017 रोजी परीक्षेचा निकाल लागला. त्यातून पात्र उमेदवारांची यादी फलकावर लावण्यात येऊन 18 ते 23 सप्टेंबरदरम्यान मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून 27 ऑक्टोबर 2017 ला निवड यादी लावण्यात आली. 30 ऑक्टोबर  2017 रोजी अंतिम यादी लावण्यात आली. मात्र यामध्ये निवड झालेले अनेक उमेदवार हे बँकेच्या पदाधिकार्‍यांचे, कर्मचार्‍यांचे नातेवाईक किंवा संबंधित होते. तसेच सर्वाधिक उमेदवार हे अकोले, संगमनेर तालुक्यातील होते. त्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने नाशिक येथील विभागीय सहनिबंधक (सहकार) यांनी कर्मचारी भरतीची चौकशी करणे आवश्यक असून पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही नियुक्ती देऊ नये, असे आदेश दिले.

प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. चौकशीनंतर समितीने सहनिबंधक नाशिक यांना अहवाल सादर केला. त्या अहवालात भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे नमूद केले. तसेच नायबरचे (नॅशनल इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड बँकिंग एज्युकेशन अँड रिसर्च) नियम पाळल्याचे दिसून आले नाहीत, असे निरीक्षण नोंदवले. त्यामुळे विभागीय सहनिबंधक नाशिक यांनी संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात निवड झालेले उमेदवार व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खंडपीठात धाव घेतली. त्यावर एकत्रित सुनावणी झाली. जिल्हा बँकेच्यावतीने अ‍ॅड. दिघे,याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ   आर. एन. धोर्डे, ऍड. विक्रम धोर्डे, अ‍ॅड. एन. बी. सूर्यवंशी, अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे, अ‍ॅड. राहुल करपे, अ‍ॅड. पी. एम. शहा यांनी काम पाहिले.