Mon, Jun 01, 2020 21:16
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › मुख्यमंत्रिपदावरून पंकजा मुंडेंचा मोठा खुलासा

मुख्यमंत्रिपदावरून पंकजा मुंडेंचा मोठा खुलासा

Last Updated: Oct 10 2019 5:06PM

पंकजा मुंढे औरंगाबाद : प्रतिनिधी 

सावरगावच्या मेळाव्यात काही जणांनी मला मुख्यमंत्री बनविण्याची मागणी केली. परंतु ते चेहरे माझ्या ओळखीचे नव्हते. भाजपमध्ये अशा पद्धतीने पदे मिळत नाहीत, हे मला चांगले माहित आहे. ते न समजण्याइतकी मी राजकारणात नवखी नाही. याशिवाय मुख्यमंत्री पदावर मी कधीही दावेदारी केलेली नाही असे स्पष्टीकरण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी गुरुवारी औरंगाबादमध्ये दिले. 

औरंगाबाद येथे गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंढे यांनी राज्य सरकारच्या पाच वर्षातील कामांची माहिती दिली. यावेळी भाजपचे प्रवक्‍ते शिरीष बोराळकर, डॉ. भागवत कराड, सुरेश धस, बसवराज मंगरुळे यांचीही उपस्थिती होती.

एका प्रश्‍नाला उत्तर देताना पंकजा मुंढे यांनी सांगितले की, सावरगावचा मेळावा हा भगवान भक्‍तांचा मेळावा होता. यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा हे मेळाव्याला उपस्थित असल्यामुळे उत्साह थोडा अधिक होता. त्यांच्यासमोर काही जणांनी मला मुख्यमंत्री बनविण्याची मागणी केली. मात्र ते भाजपचे पदाधिकारी नव्हते. ते भगवान भक्‍त होते. त्यांचे चेहरेही माझ्या ओळखीचे नव्हते. त्यामुळे ते माझ्या सहमतीने झालेले आहे, असे समजणे चुकीचे होईल.

याशिवाय भाजपमध्ये पदे देण्याची एक पद्धत आहे. ती अशा पद्धतीने मिळत नाहीत. याआधीही माझ्या नावासोबत मुख्यमंत्रीपदाचा विषय जोडला गेला. मी माझ्या तोंडून कधीही मुख्यमंत्री होण्याविषयी बोललेले नाही. तशी दावेदारीही केलेली नाही असेही त्यानी यावेळी सांगितले. 

परळी काही आमची जहागिरी नाही

परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंढे विरुद्ध धनंजय मुंढे अशी लढत होत आहे. दोनवेळा बहिणीला संधी दिली. एकवेळ भावाला द्या, असा प्रचार धनंजय मुंढे यांच्याकडून सुरू आहे. याविषयी पंकजा मुंढे म्हणाल्या, परळी ही काही आमच्या कुटुंबाची जहागिरी नाही. तिथे दुसरेही कुणी निवडणुक लढू शकते. लोकांना ज्यांचे काम पंसत असेल त्याला लोक निवडून देतील. त्यामुळे दोनदा बहिणीला दिले म्हणून एकदा भावाला द्या, असा प्रचार करणेही चुकीचे आहे.