Sun, Jul 12, 2020 18:57होमपेज › Aurangabad › अन् मुलगा वाट पाहात उपाशीच झोपला...

अन् मुलगा वाट पाहात उपाशीच झोपला...

Published On: Jun 21 2018 10:38AM | Last Updated: Jun 21 2018 10:37AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

जयभवानी नगरात नाल्यात पडून मरण पावलेले भगवान मोरे यांना नितेश व राजू ही दोन मुले व सारिका ही मुलगी आहे. उन्हाळ्यात मुलगी तिच्या मुलांना घेऊन माहेरी आली होती. शाळा सुरू झाल्याने  आई अरुणा व मोठा भाऊ नितेश  हे तिला सोडण्यासाठी हिंगोलीला गेले होते. त्यामुळे राजू व भगवान हे  बापलेक दोघेच घरी होते. रात्री राजू हा वडिलांची जेवणासाठी वाट पाहात होता. मात्र,  बराच उशीर झाल्याने त्याला झोप लागली. सकाळी मित्राने त्याला तुझे वडील नाल्यात पडल्याचे सांगितले. त्यानंतर तो रिक्षाने त्यांना घेऊन घाटीत गेला. राजू या घटनेमुळे तो प्रचंड घाबरून थरथरत होता.

नातेवाइकांच्या दुचाकी पोलिसांनी उचलल्या भगवान मोरे हे नाल्यात पडून मरण पावल्याचे कळताच त्यांच्या नातेवाइकांनी घाटीत धाव घेऊन आपल्या दुचाकी या गडबडीत घाटीतील पोलिस चौकीसमोर  लावल्या. त्यानंतर अपघात विभागातून मृतदेह शवागृहात आणला. यावेळेत वाहतूक शाखेच्या वाहन उचलून नेणार्‍या गाडीने अनामी मोरे व संदीप मोरे यांच्या गाड्या उचलून नेल्या. दरम्यान, महानगरपालिकेने नाल्यावर जाळी टाकली असती तर मोरे यांचा मृत्यू झाला नसता असा रोष नातेवाईक घाटीत व्यक्‍त करत होते. आ. सुभाष झांबड यांनी घाटीत नातेवाइकांची भेट
घेतली असता न्याय मिळवून देण्याची मागणी नातेवाइकांनी केली. 

हातातील पिशवी तशीच

भगवान मोरे हे घरी जात असताना त्यांनी कामावर जेवणाचा डबा नेलेली पिशवी त्यांच्या हातात होती. ते नाल्यात पडले तरी त्यांनी हातातील पिशवी पक्‍की धरून ठेवलेली होती. सकाळी त्यांचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा पिशवी हातात तशीच होती. या पिशवीत डब्यासोबत मजुरीचे सातशे रुपये होते. पोलिसांनी पिशवी नातेवाइकांच्या ताब्यात दिली.