औरंगाबाद : प्रतिनिधी
खंडोबाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेले गाव म्हणजेच सातारा. खंडोबाच्या मल्हारी मार्तंड अष्टकात उल्लेख असलेल्या व सातारा गावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नदीच्या काठी वसलेले महादेव मंदिर म्हणजे कार्येश्वर महादेव होय. अतिप्राचीन असलेल्या खंडोबा मंदिराप्रमाणेच समाधीवरचा महादेव म्हणून कार्येश्वराची सातारा गावात ओळख आहे.
इ.स.16 व्या शतकात सातार्यात खंडोबा मंदिराची निर्मिती झाली. याच कालावधीत गावालगतच असलेल्या नदीच्या काठी समाधीवरचा महादेव मंदिर निर्माण झाला असल्याची आख्यायिका आहे. खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक कार्येश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय जातच नाही. ही दोन्ही मंदिरे सातार्याच्या इतिहासाची आठवण देतात.
काही वर्षांपूर्वी सातार्याची नदी होती. याच नदीच्या काठावर व गावाच्या पूर्व दिशेला समाधीवरचा महादेव मंदिराची स्थापना झाली आहे. या ठिकाणी सात ऋषींची समाधी आहे. समाधीच्या जवळच शिवाचा निवास असतो अशी आख्यायिका गावकर्यांनी सांगितली. त्यामुळेच या मंदिराला समाधीवरचा महादेव असे संबोधले जाते, मात्र काळानुरूप नदीचा आकार कमी होत गेला, परिणामी नदीचे स्वरूप हे नाल्यात झाले. तसेच या ठिकाणी असलेल्या समाधींचे स्वरूपही छोटे होत गेले. घनदाट झाडांच्या गराड्यात असलेल्या समाधीवरचा महादेव कालांतराने कार्येश्वर महादेव नावाने ओळखला जाऊ लागला. मंदिराचे बांधकाम दगड, माती व विटाने करण्यात आलेले आहे.
शिवलिंगाचा आकार भव्यदिव्य
समाधीवरचा महादेव अशी ओळख असलेल्या महादेवाचे मंदिर आता कार्येश्वर महादेवाने ओळखले जाते. खंडोबा मंदिराच्या निर्मितीच्या वेळीच या मंदिराची निर्मिती झाली आहे, असे जाणकार सांगतात. ग्रामदैवतांमध्ये कार्येश्वराचे दर्शन महत्त्वपूर्ण मानले जाते. साधारणत: चारशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर असून पिंडीचा आकार भव्यदिव्य आहे. - दिलीप दांडेकर (पुजारी)
मंदिराकडे जाण्यासाठी असा आहे मार्ग ः मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सातारा गावातून एसआरपीएफकडे जाणार्या रस्त्यावर डावीकडे वळाल्यानंतर वाटेतच नाला लागतो. या नाल्याच्या जवळच कार्येश्वर मंदिराचा विस्तार झाला आहे. दुसरा मार्ग म्हणजे अहिल्यादेवी होळकर चौकातून सातारा गावाकडे येणार्या वाटेव कार्येश्वराचे दर्शन होते.