Fri, Jul 10, 2020 01:52होमपेज › Aurangabad › महाविद्यालय निवडणुकीच्या गुलालाला मुहूर्त नाही

महाविद्यालय निवडणुकीच्या गुलालाला मुहूर्त नाही

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 12:50AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

महाविद्यालयीन निवडणुका शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच घेतल्या जातील, असे उच्चशिक्षण मंत्र्यांनी गेल्यावर्षी जाहीर केले होते. मात्र, सत्र सुरू होण्यास महिना उलटला असताना निवडणुकीच्या हालचाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, विद्यार्थी नेते नाराज झाले असून त्यांनी मंत्र्यांच्या घोषणेची बोलाचा भात बोलाची कढी अशी संभावना केली आहे. 22 वर्षांच्या खंडानंतर यंदा प्रथमच महाविद्यालयीन निवडणुका खुल्या पद्धतीने होणार आहेत. 

गेल्यावर्षी शैक्षणिक सत्राच्या उत्तरार्धात निवडणुका घेतल्यामुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे पुढील वर्षी निवडणुका शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी घेण्यात येईल, असे मंत्र्यांनी जाहीर केले होते. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आता महिना उलटला असताना निवडणुकीबाबत सरकार स्तरावर कोणत्याही हालचाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थी संघटना, नेत्यांत नाराजी पसरली आहे. गेल्यावर्षी उशिरा निवडणूक झाल्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधींना काम करण्याची अजिबात संधी मिळाली नाही. यंदा तसे होऊ नये, अशी त्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी शासनाकडून सूचना येताच निवडणुका घेतल्या जातील, असे सांगितले.

विद्यार्थी नेत्यांची टीका

सरकारने गेल्यावर्षी निवडणुकीचा विचका केला. यंदा तसे करू नये. सरकारने लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यापासून पळ काढल्यास स्टुंडट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) मोठे आंदोलन उभारेल, असा इशारा संघटनेचे सुनील राठोड यांनी दिला. विद्यार्थी विरोधी धोरणे खपवून घेतली जाणार नाहीत, असेही तो म्हणाला. विकास ठाले या विद्यार्थ्याला सरकार विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यास नेहमीच दिरंगाई करते असे वाटते. विद्यार्थी प्रतिनिधींना जितका अधिक वेळ मिळेल तितके विद्यार्थ्यांचे प्रश्‍न लवकर सुटतील. त्यामुळे सरकारने निवडणूक लवकर घ्यावी, अशी मागणी त्याने केली. एसएफआयच्या मनीषा मगरेचेही निवडणुका लवकर घेणे गरजेचे असल्याचे मत आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी लवकर निवडणे गरजेचे आहे. विद्यापीठाचे उदाहरण घ्यायचे झाल्यास वसतिगृहे, विविध विभाग येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अनेकदा पिण्याचे पाणी नसते. विद्यार्थी प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे प्रश्‍न जेवढ्या पोटतिडकीने मांडू शकतो, तेवढे अन्य कोणी मांडू शकत नाही, असे ती म्हणाली.