Tue, Aug 04, 2020 22:51होमपेज › Aurangabad › नऊ हजारांवर जागा राहणार रिक्‍त

नऊ हजारांवर जागा राहणार रिक्‍त

Published On: Jun 25 2018 1:45AM | Last Updated: Jun 25 2018 1:23AMऔरंगाबाद : भाग्यश्री जगताप

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात औरंगाबाद जिल्ह्यात 59 हजार 395 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. सध्या पालकांची विद्यार्थ्यांना  दहावीनंतर अकरावी व इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू आहे, मात्र दहावीनंतरच्या अभ्यासक्रमांच्या उपलब्ध असणार्‍या जागा 68 हजार 755 एवढ्या आहेत. त्यामुळे यंदा सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊनही जवळपास नऊ हजार जागा रिक्त राहणार आहेत.  

यंदाच्या वर्षी विद्यार्थी संख्येपेक्षा अकरावी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमता ही उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक असल्याने महाविद्यालयांच्या पाच हजारांवर जागा रिक्‍त राहण्याची शक्यता आहे. 

कला शाखेच्या सर्वाधिक जागा

जिल्ह्यात अकरावीसाठी एकूण प्रवेश क्षमता 62 हजार 540 विद्यार्थ्यांची आहे. त्यात कला शाखेसाठी 29 हजार 900, वाणिज्य शाखेसाठी 6 हजार 440 तर  विज्ञान शाखेसाठी 25 हजार 200 जागांचा समावेश आहे. मात्र गेल्या  शैक्षणिक वर्षापासून मनपा हद्दीतील महाविद्यालयात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. शहरातील महाविद्यालयांत अकरावीच्या 28 हजार 735 जागा उपलब्ध आहेत.  या जागांसाठी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, उर्वरित जागांसाठी ऑफलाइन पद्धतीने प्रवेश होणार आहे.

अकरा तंत्रनिकेतनमध्ये 4 हजारांवर जागा

इंजिनिअर होऊ इच्छिणारे अनेक विद्यार्थी पॉलिटेक्निक करून अभियांत्रिकी पदवीच्या दुसर्‍या वर्षात प्रवेश घेतात. नोकरीची गरज असणारे विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना प्राधान्य देतात. जिल्ह्यात 11 पॉलिटेक्निक संस्था असून, त्यांची प्रवेश क्षमता 4 हजार 215 एवढी आहे. ‘आयटीआय’मध्ये 2  हजार जागा आहेत. त्यामुळे व्यवसाय अभ्यासक्रमाला सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.