Sun, Oct 25, 2020 07:06होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : नाथसागर धरणाचे २७ दरवाजे उघडले

औरंगाबाद : नाथसागर धरणाचे २७ दरवाजे उघडले

Last Updated: Sep 18 2020 11:15AM
धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले,
गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पैठण (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा 

नाथसागर धरणाच्या परिसरासह  वरच्या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत चालली आहे. नाथसागर धरण हे जवळजवळ शंभर टक्के भरले असल्यामुळे नाथसागर धरणाचे रात्री साडेतीन वाजता सर्व २७  दरवाजे उघडले आहे. यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून पैठण शहरासह गोदाकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पाण्याचा विसर्ग एक लाखाच्या आसपास करणार असल्याचे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे म्हणाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी, नाथसागर धरणाची पाणीपातळी १५२१.९० फूट झाली असून या धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३७हजार ६६२ क्युसेक आहे. आज रोजी धरणाची टक्केवारी ९९.४४ टक्के झाली आहे. धरणाचे १८ दरवाजे चार फुटाने उघडलेले आहेत. तर नाथसागर धरणाचे आपत्कालीन ९ दरवाजेही पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन फुटांनी उघडण्यात आले आहे. धरणाचे २७ दरवाजे उघडले असून दरवाजामधून ९४ हजार ३२० क्युसेक पाणी गोदावरी पात्रात सुरू आहे. अनेक वर्षानंतर एवढ्या प्रमाणावर गोदावरी पात्रात विसर्ग करण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे पैठण शहरासह गोदाकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके, कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी केले आहे. 
 

 "