Tue, Dec 10, 2019 02:56



होमपेज › Aurangabad › मुंब्रा, औरंगाबाद येथून काश्मीरच्या अतिरेक्यांना पैसा

मुंब्रा, औरंगाबाद येथून काश्मीरच्या अतिरेक्यांना पैसा

Published On: Feb 15 2019 1:46AM | Last Updated: Feb 15 2019 1:23AM




औरंगाबाद : प्रतिनिधी  

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) औरंगाबाद आणि मुंब्रा येथून अटक केलेले इसिस समर्थक ‘उम्मत-ए-मोहंमदिया’ ग्रुपच्या माध्यमातून काश्मिरातील अतिरेक्यांशी चॅटिंग करीत होते. तसेच, त्यांनी काश्मीरच्या अतिरेक्यांना पैसे पुरविल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यावरून न्यायालयाने सर्व संशयित अतिरेक्यांना पुन्हा 18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

जमान नवाब खुटेउपाड, सलमान सिराजोद्दीन खान, फहाद मोहंमद इस्तेयाक अन्सारी, मजहर अब्दुल रशीद शेख, मोहंमद तकी ऊर्फ अबू खालिद सिराजोद्दीन खान, मोहसीन सिराजोद्दीन खान, मोहंमद मुशाहिद उल इस्लाम, मोहंमद सर्फराज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी आणि तल्लत ऊर्फ अबुबकर हनीफ पोतरीक, अशी संशयित अतिरेक्यांची नावे आहेत. यांच्यापैकी मोहसीन हा अतिरेक्यांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले.

इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने औरंगाबाद आणि मुंब्रा येथे 21 जानेवारीला छापेमारी करून नऊ संशयितांना अटक केली होती. ते विविध धार्मिक स्थळांच्या महाप्रसादात विषप्रयोग करून नरसंहार करण्याच्या तयारी होते. तसेच, पिण्याच्या पाण्यात विष घालवून घातपात करण्याचा त्यांनी कट रचला होता, असा आरोप एटीएसने केला. 

दरम्यान, तपासात दहाव्या संशयितालाही अटक केली होती. त्यांच्याकडून तयार केलेले विषारी द्रव्य, हार्ड डिस्क, मोबाइल, सीमकार्ड, लॅपटॉप आणि इसिसचे विविध लेख आढळले होते. या आरोपींना सुरुवातीला पंधरा दिवसांची कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

खाते सील केले !

  एटीएस पथकाने संशयित अतिरेक्यांचे बँक खाते सील केले आहे. या खात्यांची तपासणी केल्यावर त्यातून परदेशात पैसा गेल्याचे समोर आल्याचा दावा एटीएसने केला आहे. त्यामुळे या सर्व संशयितांच्या खात्यांची तपासणी करण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने  18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आंतरराष्ट्रीय तपास

 संशयित अतिरेक्यांना गुरुवारी विशेष न्यायाधीश के. आर. चौधरी यांच्यासमोर हजर करण्यात आले. अतिरिक्त लोकाभियोक्ता सतीश मुंडवडकर यांनी पोलीस कोठडीदरम्यान तपासात प्रगती झाल्याचे नमूद करीत ही माहिती देशहितासाठी गोपनीय ठेवावी लागत असल्याचे सांगितले. संशयितांच्या मोबाइलची तांत्रिक पद्धतीने तपासणी केली असता त्याने काश्मीरमधील अतिरेक्यांशी चॅटिंग केल्याचे समोर आले आहे. हा आंतरराष्ट्रीय तपास असल्यामुळे वेळ लागणार आहे, असेही सांगण्यात आले.

आई-वडिलांची भेट

  संशयित अतिरेक्यांना कोर्टात हजर केल्यावर त्यांचे आई-वडील व इतर नातेवाईक कोर्टात गर्दी करतात. तसेच, ते भेट घेण्यासाठी पोलिसांवर दबाव आणतात. भेट घेतल्यावर कोणतीही माहिती न देण्यासाठी दबाव टाकत असल्याचे पत्र एटीएसने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर केवळ आई-वडिलांनी पोलिस अधिकार्‍यांसमोर भेटावे, अशा सूचना न्यायालयाने दिल्या.