औरंगाबाद : प्रतिनिधी
वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होऊनही भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरुद्ध जालन्यातील शिवसेना नेतेराज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुकारलेले बंड अद्याप शमलेले दिसत नाही. गुरुवारी खोतकर यांनी अचानक औरंगाबादेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांची भेट घेत, तब्बल तासभर चर्चा केली. या बैठकीनंतर सत्तार यांनीही ‘दोन दिवसांमध्ये खोतकरांबद्दल गोड बातमी देतो’, असे पत्रकारांना सांगत पुन्हा एकदा खोतकर हे जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढू शकतात, असे संकेत देत दानवे यांचे ‘टेन्शन’ वाढविलेआहे.
जालन्यात दानवे आणि खोतकर यांच्यात अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. आपण दानवेयांना पाडणारच, त्यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढणार, असे दोन महिन्यांपूर्वीच खोतकर यांनी जाहीर केले होते. युती होणार नाही, असे गृहीत धरून खोतकर यांनी लोकसभेची तयारीही सुरू केलेली होती. अचानक युती झाली. मात्र, युतीच्या घोषणेनंतरही खोतकर यांनी माघार घेतली नाही. हीच संधी साधून काँग्रेसने खोतकरांवर जाळे टाकण्यास सुरुवात केली.खोतकर लढले तर दानवेंना अडचणीचे ठरू शकते,
हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खोतकर यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर खोतकर आणि दानवेहे दोघे दोन-तीन वेळा एकाच व्यासपीठावरही आले.त्यावरून खोतकरांचे बंड शमले असे वाटत होते. मात्र, गुरुवारी पुन्हा एकदा खोतकर आणि आ. सत्तार यांच्या भेटीने भाजपच्या गोटात खळबळ उडाली.