Sat, Jan 18, 2020 10:56होमपेज › Aurangabad › ऊस लागवड सोडणार्‍या शेतकर्‍यांना मदत द्यावी

ऊस लागवड सोडणार्‍या शेतकर्‍यांना मदत द्यावी

Last Updated: Jan 17 2020 1:13AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

हरियाणात गहू, ऊस, धान ही पिके सोडणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून प्रति हेक्टरी दोन हजार रुपयांची मदत केली जाते. याच पद्धतीने महाराष्ट्रातही ऊस उत्पादन सोडणार्‍या शेतकर्‍यांना मदत देणे गरजेचे असल्याचे केंद्रीय जलशक्‍ती मंत्री नितीन कटारिया यांनी सोमवारी (दि.13) येथे सांगितले.

नॅशनल वॉटर मिशनच्या वतीने बीड बायपास येथील एका हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या ‘सही फसल’ या शेतकरी परिषदेचे उद्घाटन कटारिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्राचे अतिरिक्‍त जलसचिव जी. अशोक कुमार, केंद्रीय जलसंपदा विभागाचे सचिव यू.पी.सिंह, जलसंपदाचे सचिव राजेंद्र  पवार, महापौर नंदकुमार घोडेले, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर, कडाचे मुख्य अभियंता डी.डी. तवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

केंद्रीय सचिव सिंह यांनी सांगितले की,  लहान मुलाला दूध देण्याची गरज असते मात्र, दूध जास्त असल्यास त्याला स्नान घालणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे. ज्याच्याकडे पाणी आहे त्यांच्याकडून शेतीला आधिक पाणी दिले जात आहे. मात्र ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांना वाट पहावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन तासांत उरकली परिषद : ‘सही फसल’ परिषदेसाठी एका दिवसांत 50 लाखांचा चुराडा करण्यात आला. शहरातील विविध पंचतारांकित हॉटेलमधील 25 खोल्यांमध्ये  निवास व्यवस्था करण्यात आली होती. आलिशान वातानुकूलित वाहने पाहुण्यांच्या दिमतीला देण्यात आली होती. ही परिषद बीड बायपास रस्त्यावरील एका महागड्या हॉटेलमध्ये घेण्यात आली. अवघ्या तीन तासांत परिषद उरकण्यात आली. भोजन व्यवस्थेचे नियोजन कोलमडल्याने अनेक शेतकरी उपाशी परतले.