Thu, Jul 02, 2020 18:36होमपेज › Aurangabad › दहशतीने वसतिगृहातून विद्यार्थिनींचे स्थलांतर

दहशतीने वसतिगृहातून विद्यार्थिनींचे स्थलांतर

Published On: Dec 14 2018 1:43AM | Last Updated: Dec 14 2018 1:25AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

मेडिकलच्या विद्यार्थिनीचा एमजीएमच्या वसतिगृहात गळा आवळून खून झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेमुळे वसतिगृहात राहणार्‍या मुलींमध्ये दहशत पसरली असून गुरुवारी अनेक विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडले. कोणी घरी तर कोणी शहरातील नातेवाइकांकडे राहण्यासाठी गेल्या.  

महात्मा गांधी मिशन (एमजीएम) परिसरातील वसतिगृहात राहणार्‍या मेडिकलच्या विद्यार्थिनीचा वसतिगृहातील खोलीमध्येच गळा आवळून खून झाला. गंगा या मुलींच्या वसतिगृहातील खोली क्र. 334 मध्ये ही घटना बुधवारी घडली. आकांक्षा अनिल देशमुख (22, रा. झेंडा चौक, माजलगाव, जि. बीड. ह.मु. गंगा वसतिगृह, एमजीएम परिसर) हिचा खून झाला असून ती एमजीएमच्या फिजिओथेरपी कॉलेजमध्ये मास्टर्स ऑफ फिजिओथेरपी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होती. तिने मेडिकलच्या पदवीचे शिक्षणही येथेच घेतले असून पाच वर्षांपासून याच वसतिगृहात राहात होती.

वसतिगृहातच राहणार्‍या मुलीचा खून झाल्याने वसतिगृहातील इतर मुलींच्या मनात खुनाबाबत दहशत निर्माण झाली आहे. पोलिस अधिकार्‍यांची तपासणी तसेच खुनाबाबत विचारणा या भीतीदायक वातावरणात राहण्यास मुलींना अशक्य झाल्याने मुलींनी तात्पुरत्या स्वरूपात का होईना हे वसतिगृह सोडण्याचा निर्णय घेतला आहे. घडलेला प्रकार समजल्याबरोबर वसतिगृहातील अनेक विद्यार्थिनींना पालक घरी घेऊन जाण्यासाठी आले होते. तर काही मुली या गावाकडे निघून गेल्या. काहींना गाव दूर असल्याने तिकडे जाणे शक्य नव्हते. अशांनी शहरातील नातेवाईक किंवा मैत्रिणीचे घर गाठले.

तो मजला केला रिकामा

वसतिगृहाच्या ज्या मजल्यावर आकांक्षा देशमुखचा खून झाला. मुली खुनामुळे घाबरून जाऊ नये म्हणून त्या मजल्यावरील इतर खोल्यांमध्ये राहणार्‍या मुलींना वसतिगृहाच्या इतर मजल्यावरील रूममध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी तो मजला तपासकामासाठी ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात आले.