Sat, Aug 08, 2020 02:05होमपेज › Aurangabad › 1019 शालेय विद्यार्थ्यांचे अर्धातास मेडिटेशन : ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी केला विश्‍वविक्रम

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 24 2018 1:29AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दिव्य ऊर्जा योग महोत्सवात औरंगाबाद येथील 1019 शालेय विद्यार्थ्यांनी अर्धा तास मेडिटेशन करून शनिवारी (दि.23) सायंकाळी 8 वाजून 48 मिनिटांनी ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आपल्या नावावर केले. या प्रकारचे हे रेकॉर्ड पहिल्यांदा झाले आहे, असे ऊर्जा योगचे संस्थापक तथा एनर्जी गुरू अरिहंत ऋषी यांनी जाहीर केले. 

योगदिनानिमित्त दिव्य ऊर्जा योग महामहोत्सवाचे अयोजन शनिवारी (दि.23) शहरात तापडिया कासलीवाल मैदान येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी एनर्जी गुरू अरिहंत ऋषी यांनी हा विश्‍वविक्रम जाहीर केला. एनर्जी गुरू अरिहंत ऋषी म्हणाले की, आजपर्यंत योगासने केल्याचे अनेक रेकॉर्ड झालेले आहेत. मात्र, एकाच वेळी मेडिटेशन करण्याचे रेकॉर्ड पहिल्यांदाच झालेले आहे. यावेळी तनवाणी इंग्लिश स्कूल आणि पी. यू. जैन शाळेच्या 1019 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अर्धा तास मेडिटेशन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी ओंकार, चंद्र, गोलाकार, त्रिकोण या आकारात एक सिम्बॉल तयार केला. याचे सर्व श्रेय शालेय विद्यार्थ्यांना जाते. 

या वेळी अभिनेता अस्मित पटेल, सिंगर स्टिव्हन बेन आणि क्रिकेटर धवन कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे अधिकारी निखिल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. आचार्य कुशाग्रनंदी म्हणाले, आज जगभरात अशांतता आणि हिंसेचे वातावरण आहे. या वातावरणात मनःशांती हवी असल्यास योगासने आणि प्राणायामची नितांत आवश्यकता आहे. आचार्य देवनंदी म्हणाले, विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार, बिझनेसमन अथवा उद्योजक त्यांची सर्वांची अनेक वर्षांची साधना असते. कोणतीही साधना करीत असताना मोहमायेपासून दूर राहिल्यास तुमच्या साधनेत अडथळा निर्माण होणार नाही. 

यावेळी आचार्य कुशाग्रनंदी महाराज, आचार्य देवनंदी महाराज, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी महापौर बापू घडामोडे, क्रिकेटपटू धवन कुलकर्णी, श्री. श्री. वैशंपायन, सिंधूताई सपकाळ, आचार्य जितेंद्र महाराज, ललित पाटणी, प्रमोद कासलीवाल, मनोज साहुजी, संजय कासलीवाल, डी. बी. कासलीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.