Sat, Jul 04, 2020 00:51होमपेज › Aurangabad › नोकर्‍यांबाबत मराठा उद्योजक सकारात्मक

नोकर्‍यांबाबत मराठा उद्योजक सकारात्मक

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 05 2018 1:28AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

जिल्ह्यातील उद्योजकांशी समन्वय साधून रोजगार मेळावा घेऊ, नोकर्‍या देऊ. व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करू, पण आत्महत्या करून जीवन संपवू नका, असे आवाहन मराठा समाजातील उद्योजकांनी केले आहे. आरक्षणासाठी आणि बेरोजगारीने कंटाळून गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात चार युवकांनी आत्महत्या केल्या. या पार्श्‍वभूमीवर दै. ‘पुढारी’सोबत बोलताना उद्योजकांनी भावना व्यक्‍त केल्या.

एखाद-दुसर्‍यास नोकरी देण्यापेक्षा सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन रोजगार मेळावा घेण्याचा आम्ही विचार करत आहोत. जिल्ह्यात 1600 उद्योजक असून मसिआच्या सर्वसाधारण बैठकीत सर्व उद्योजकांना याबाबत आवाहन करणार आहे. त्यांच्याकडील पदांची शैक्षणिक पात्रतेनुसार माहिती गोळा करून मेळावा घेऊ. शैक्षणिक पात्रतेनुसार तरुणांना नोकर्‍या देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. मात्र, आत्महत्येसाठी जीवन नसते हे युवकांनी समजून घ्यावे.     - अजुर्र्न गायके

नोकरीअभावी नैराश येणे स्वाभाविक आहे, पण आत्महत्या हा उपाय नाही. युवकांनी बायोडाटासह संपर्क करावा. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शक्य तितक्या जणांना नोकरी मिळवून दिली जाईल. तसेच व्यवसाय, उद्योग करू इच्छिणार्‍या तरुणांना बँकांकडून भांडवल उपलब्ध करून देण्यासाठीही मदत करण्याची तयारी आहे.- जे. के. जाधव

युवकांना नोकरी देणे हा एक भाग झाला. पण, आत्महत्येने कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे पुढील आयुष्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील युवकांना स्किलबेस नॉलेज देण्याचा प्रयत्न आम्ही करू. - मानसिंग पवार

मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या बंधूला संस्थेत जागा असल्याने तत्काळ नोकरी उपलब्ध करून दिली. पण, सध्या नवीन पदे आणि जागा नाही. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मात्र मंच उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. - सतीश चव्हाण, आमदार