होमपेज › Aurangabad › मराठा क्रांती ठोक मोर्चा : तिसर्‍या पर्वाचे रणशिंग

मराठा क्रांती ठोक मोर्चा : तिसर्‍या पर्वाचे रणशिंग

Published On: Nov 03 2018 1:28AM | Last Updated: Nov 03 2018 1:09AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासंदर्भात 15 नोव्हेंबरपूर्वी सत्ताधार्‍यांसह विरोधातील सर्व पक्षांनी भूमिका जाहीर करावी, अन्यथा 25 नोव्हेंबरनंतर एकाही आमदार, खासदाराला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला. न्यू हनुमाननगर चौकात आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी तिसर्‍या पर्वाचे रणशिंग फुंकण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दोन वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र समाजाला झुलवत ठेवत सरकारने अद्यापही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. राज्यकर्त्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा दिलेला शद्ब पाळावा, असे आवाहन न्यू हनुमान नगरात आयोजित सभेत समन्वयक रमेश केरे यांनी केले. अन्यथा 25 नोव्हेंबरनंतर राज्यातील 288 आमदार व 48 खासदारांना फिरू देणार नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईचे तिसरे पर्व आजपासून सुरू झाले असून येणार्‍या काळात मराठवाड्यात 80 सभांचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही केरे म्हणाले. तुळजापूरचे सुनील नागवे यांनी पंतप्रधान मन की बात सांगतात; पण मराठा समाजाच्या मनातील त्यांना कळत नाही का? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यांना समाजाच्या मनातील गोष्ट कळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भक्‍ती, शिवगीत व पोवाडे सादर करण्यात आले. यावेळी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मरायचं नाही, लढायचं

आरक्षण घेतल्याशिवाय आपण गप्प बसणारच नाही; मराठा मरणारा नाही, तर लढणारा आहे. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन पूजा मोरे यांनी केले. तसेच तरुणांनी जागरूक राहावे, मिळेल ते काम करून सक्षम व्हावे. सरकार आरक्षणाबाबत कोर्टाकडे बोट करते; पण त्यांच्या हाती असलेल्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला निधी आणि तालुका स्तरावर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बनवण्याचेही काम त्यांनी केले नसल्याचे मोरे म्हणाल्या. आतापर्यंत 40 बांधवांचा जीव गेला, शासनाला किती बळी हवेत, ते सांगावे. आरक्षण मिळाले नाही, तर शासनाचाच बळी देऊ, असे शैलेश भिसे म्हणाले.