होमपेज › Aurangabad › महापरीक्षा पोर्टलचा अंदाधुंद कारभार चव्हाट्यावर

महापरीक्षा पोर्टलचा अंदाधुंद कारभार चव्हाट्यावर

Published On: Jul 17 2019 8:04PM | Last Updated: Jul 17 2019 7:56PM
अंधारी : दीपक शिरसाठ 

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येत असलेल्या तलाठी भरती पेपरमध्ये अनेक गोंधळ उडवणाऱ्या बाबी समोर येत आहेत. तलाठी पदासाठी जाहिरात निघाली तेव्हा दिलेल्या सूचनेनंतर प्रत्येक उमेदवारास महाराष्ट्रातील कोणत्याही एका जिल्ह्यात तलाठी पदासाठी फॉर्म भरता येत होता. मात्र, या नियमांचे उल्लंघन करत काही उमेदवारांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरले. यामध्ये काहींनी दोन, चार, पाच, सहा या प्रमाणात फॉर्म भरले असून त्यांनी सरळ महापरीक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. यामुळे इतर बहुसंख्य प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे.

तलाठी पदाचा फॉर्म भरताना काही उमेदवारांनी वेगवेगळे ईमेल आयडी वापरुन फॉर्म भरले आहेत. कहर म्हणजे या सर्व उमेदवारांचे वेगवेगळ्या फॉर्मचे स्वतंत्र प्रवेश पत्रे निघाली आहेत. परीक्षेचे दिवसही वेगवेगळे मिळालेले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे नियमांचे पालन करणाऱ्या उमेदवारांवर हा अन्याय आहे. सर्व उमेदवारांची माहिती, आधार कार्ड नंबरचा डेटा असतानासुद्धा केवळ मेल आयडी बदलून एवढ्या मोठ्या परीक्षा आयोजित करणाऱ्या पोर्टलला भावी अधिकाऱ्यांनी फसवले आहे. कोणतीही खातरजमा न करता त्यांना परीक्षा प्रवेशपत्र देणेही अन्यायकारकच असून याची सर्व जबाबदारी महापरीक्षा पोर्टलचीच आहे.

चकवा देऊन फसवणूक करणाऱ्या उमेदवारावर कडक कारवाई केली पाहिजे व या उमेदवारांची उमेदवारी रद्द केली पाहिजे. उमेदवारांनी ईमेल आयडी वेगळे वापरले असले तरी त्यांची नावे मात्र सर्व फॉर्मवर सारखीच असणार आहेत. त्यांमध्ये आधार क्रमांक ही तेच असणार आहेत. महापोर्टलकडे प्रत्येक उमेदवारांच्या पात्रतेची वैयक्तिक माहिती असते त्यामुळे त्यांनी योग्य रीतीने अशा उमेदवारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी उमेदवारांनी मागणी केली आहे.

केवळ एकाच ठिकाणी फॉर्म भरायचा नियम असल्याने तो पाळत आम्ही एकाच ठिकाणी धुळे जिल्ह्यात फॉर्म भरला. नियम डावलून फॉर्म भरल्याने बऱ्याच जणांचा पाच ते सहा ठिकाणी पेपर आला आहे. त्यामुळे ते डमी उमेदवार बसवत आहेत. अशाने जीव तोडून वर्षभर अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर एक प्रकारचा अन्याय आहे. महापरिक्षा पोर्टलने आमच्यावरील अन्याय दूर करीत अशा उमेदवारांवर कठोर कारवाई करून दिलासा द्यावा. - 

-संदीप शिरसाठ  उमेदवार, तलाठी भरती