होमपेज › Aurangabad › सहा मिनिटांत फुटला एमबीएचा पेपर!

सहा मिनिटांत फुटला एमबीएचा पेपर!

Published On: Jan 02 2018 8:26AM | Last Updated: Jan 02 2018 12:59AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

एमबीएच्या प्रथम वर्षाच्या पेपरला सुरुवात होताच अवघ्या सहा मिनिटांमध्येच पेपर फुटला. परीक्षार्थीने मोबाइलवर प्रश्‍नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केले. हा प्रकार सोमवारी सकाळी वसंतराव नाईक महाविद्यालयात घडला. 

प्रश्‍नपत्रिका बाहेर येताच दोन जण त्यावरून कॉपी बनवून पाठवू लागले; परंतु महाविद्यालयाच्या दोन दक्ष कर्मचार्‍यांमुळे त्यांचा भांडाफोड झाला. पेपर फोडणार्‍या परीक्षार्थीसह त्याच्या दोन साथीदारांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर हा पेपरच रद्द करण्यात आला. 

एमबीए प्रथम वर्षाची 26 डिसेंबरपासून परीक्षा सुरू आहे. औरंगाबादेतील दोन परीक्षा केंद्रांसह चार जिल्ह्यांतील सहा केंद्रांवर 2028 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. सोमवारी ‘अकाउंटिंग ऑफ मॅनेजर्स’ या विषयाचा पेपर होता. सकाळी दहा वाजता परीक्षेला सुरुवात झाली. नाईक कॉलेजच्या केंद्रावर हॉल क्रमांक सहामधील देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज्चा विद्यार्थी शेख अजमद कलीम याने आपल्या मोबाइलने प्रश्‍नप्रत्रिकेचा फोटो काढून अवघ्या सहा मिनिटांमध्ये ‘फ्युचर मॅनेजर’ या व्हॅाट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केला. 

पेपर व्हायरल करताच महाविद्यालयाबाहेर त्याचे मित्र योगेश बहुरे आणि शेख मज्जू यांनी गाईडमधून प्रश्‍नपत्रिकेची उत्तरे शोधण्यास सुरुवात केली. ही गडबड महाविद्यालयीन कर्मचारी सतीश पवार यांच्या नजरेस पडली. त्यांनी या दोघांना हटकले. हा गोंधळ पाहून महाविद्यालयाचे रवी गवळी व हनुमंत कोरडे हे दोन कर्मचारी तेथे धावत आले. त्यांनी मज्जू आणि योगेशला पकडले. 

विद्यार्थी संतापले 

पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा मिनिटांमध्येच हा पेपर फोडण्यात आला. हे उघडकीस येईपर्यंत  90 विद्यार्थ्यांनी 90 टक्के उत्तरपत्रिका सोडविल्या होत्या. प्राचार्य डॉ. मिलिंद उबाळे यांनी परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांना या प्रकरणाची माहिती दिली. तेव्हा त्यांनी हा पेपर थांबवून उत्तरपत्रिका गोळा करण्याचे सांगितले. पेपर रद्द करण्याच्या निर्णयामुळे इतर विद्यार्थी संतापले.