Tue, Sep 22, 2020 10:34होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : दारूचा ९६८ कोटी महसूल बुडाला 

औरंगाबाद : दारूचा ९६८ कोटी महसूल बुडाला 

Last Updated: Jul 13 2020 9:02AM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊनमुळे औरंगाबाद जिल्ह्यातून मिळणारा दारूचा तब्बल ९६८ कोटी रुपये महसूल बुडाला. गतवर्षी एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात १ हजार २४१ कोटी ६६ लाख १० हजार ५५७ रुपये महसूल जमा झाला होता. यंदा हा आकडा ७८ टक्क्यांनी घटला असून, ९६८ कोटी ५१ हजार रुपयांची तूट आली आहे. त्यामुळे यंदा या तीन महिन्यात केवळ २७३ कोटी ६५ लाख ५९ हजार ५१६ रुपये महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.

वाचा :  औरंगाबाद जिल्ह्यात दुपारी ६६ रुग्णांची वाढ

लॉकडाऊनमुळे एप्रिल आणि मे महिन्यात सुमारे दोन महिने दारू दुकाने आणि कंपन्याही बंद राहिल्या. परिणामी तळीरामांच्या घश्याला कोरड पडली. कधी एकदाचा दारूचा घोट घशात जातो, असे झाले होते. अखेर जून महिन्यात दारू दुकाने उघडली अन तळीरामांचा जीव भांड्यात पडला. या काळात सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. केंद्र आणि राज्य शासनाच्या महसुलात मोठी तूट निर्माण झाली होती. दरम्यान, दारूविक्री सुरू झाल्यावर सरकारला या व्यवसायातून महसूल मिळणे सुरू झाले. 

औरंगाबाद जिल्ह्यात ५३४ बार, ११२ बिअर शॉप, १२० देशी दारू आणि ३१ वाइन शॉप आहेत. शहरात वाइन शॉपी आणि बिअर शॉपी मधून केवळ ऑनलाइन विक्री सुरू होती. तसेच ग्रामीण भागातील दारू दुकानेही उघडली होती. दारूविक्री काहीशी पूर्वपदावर येत असताना शहर आणि वाळूज भागात पुन्हा १० ते १८ जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आला. त्यामुळे पुन्हा सर्व दारू दुकाने बंद झाली. पण, पूर्वीच्या लॉकडाऊनचा अनुभव गाठीशी असल्याने यावेळी मद्यपींनी साठा करून ठेवला आहे. 

एप्रिल महिन्यात सर्वाधिक घट 

एप्रिल महिन्यात गतवर्षी ३५५ कोटी १३ लाख ३४ हजार २१७ रुपये महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला होता. यंदा एप्रिल महिन्यात केवळ ९ कोटी १३ लाख २४ हजार ८७४ रुपये इतकाच महसूल जमा झाला. म्हणजे तब्बल ९७ टक्के घट आली. गतवर्षी मे महिन्यात ४९३ कोटी ६९ लाख २७ हजार १३१ रुपये इतका महसूल जमा झाला होता. यंदा मे महिन्यात ८६ टक्के तूट आली असून, केवळ ७० कोटी ३९ लाख १२ हजार ६९३ रुपये महसूल जमा झाला. जून महिन्यात मात्र ही तूट आणखी कमी होऊन ५१ टक्क्यांवर आली. ३९२ कोटी ८३ लाख ४९ हजार २०९ रुपये महसूल जमा झाला होता. यंदा हा आकडा १९४ कोटी १३ लाख २१ हजार ९४९ रुपये इतका आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक कदम यांनी दिली. 

औरंगाबादचे उद्दिष्ट तीन कोटींहून अधिक 

औरंगाबाद जिल्ह्यात दारू उत्पादन कंपन्या असल्याने उत्पादन शुल्क विभागाचे उद्दिष्ट दरवर्षी वाढत आहे. गतवर्षी २ हजार ७०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यंदा हे उद्दिष्ट तीन हजार २०० कोटींहून अधिक देण्यात आले आहे. दारूच्या एकूण महसुलात औरंगाबादचा राज्यात सहावा, सातवा क्रमांक असतो. यंदा मात्र महसुलात मोठी घट आल्याने उद्दिष्ट पूर्ण होते की नाही, अशी चिंता उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना लागली आहे.

वाचा : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने ३५० रुग्णांचा मृत्यू

 "