Sat, Jul 04, 2020 01:14होमपेज › Aurangabad › कार्यालयांमध्येही ‘चमकोगिरी’

कार्यालयांमध्येही ‘चमकोगिरी’

Published On: Jul 09 2018 1:33AM | Last Updated: Jul 09 2018 1:33AMऔरंगाबाद : राहुल जगदाळे

शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांच्या आवारात ‘पोस्टरबॉईज्’च्या चमकोगिरीचे मोठमोठे फ्लेक्स झळकत आहेत. मनपा, जिल्हा परिषदेसह अनेक कार्यालय परिसरात अनधिकृत बॅनरबाजी पाहायला मिळते. या चटकफू शुभेच्छा अपघातास कारणीभूतही ठरू शकतात, मात्र संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांची मेहरनजर असल्याने कारवाई कोण करणार, असा प्रश्‍न उपस्थित होतो. नियम आणि न्यायालयाच्या निर्देशाचा पोस्टरबॉईज्सह अधिकार्‍यांनाही सोयीस्करपणे विसर पडला आहे.

महापालिकेला कर भरूनच शहरात अधिकृतपणे जाहिरात लावण्यास परवानगी दिली जाते. तरीही काही महाभाग आपले नेते,  मित्र, आप्‍तेष्टांना शुभेच्छा देण्यासाठी बेकायदा होर्डिंग्ज लावत आहेत. विशेष म्हणजे अशा पोस्टरबॉईज्चे पेव थेट शासकीय कार्यालयांच्या आवारातही पसरले आहे. अनधिकृत होर्डिंग्जला लगाम लावणार्‍या मनपाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या आवारातच दोन अनधिकृत फ्लेक्स लागलेले आहेत. याशिवाय जिल्हा परिषद, कृषी विभाग, भूमी अभिलेख, शासकीय मुद्रणालय आदी विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरांमध्ये स्थानिक नेते आणि संघटनेचे भले मोठे फ्लेक्स लावलेले आहेत. राजकीय नेत्यांचे वाढदिवस, निवड,नियुक्त्यांचा आनंद व्यक्‍त करण्यासाठी अनधिकृतपणे बॅनरबाजी केली जाते. कार्यालयांच्या आवारातील अनधिकृत जाहिरातबाजीत कर्मचारी संघटना, शिक्षक, अभियंता यासारख्या संघटना तर अग्रेसर असतात. प्रत्येक कार्यालयात नेत्यांचे पोस्टर्स नसले तरी अशा संघटनांची बॅनरबाजी नक्‍कीच पाहायला मिळते. धोकादायक पद्धतीने लावण्यात येणार्‍या अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स कोसळून अपघात होण्याचीही शक्यता आहे. मात्र, संबंधित कार्यालय प्रशासनाकडून पोस्टरबाजांवर कारवाईऐवजी मेहरनजर दाखवली जाते.